मिसेस परफेक्शनिस्ट


हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्यांचं अनभिषिक्त साम्राज्य पूर्वीपासूनच चालत आलं आहे. राज कपूर, देवानंद, राजेश खन्ना, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, खान त्रयी ते अगदी आत्ताच्या हृतिक, रणबीर पर्यंत. हे सर्व उत्तम अभिनेते होते असेही नाही, पण त्यांनी बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले हे खरे.
अभिनेत्रींना मात्र अशी छाप फारशी कधी पाडता आली नाही. अर्थात या विधानाला सुद्धा नर्गिस, नूतन, रेखा, स्मिता पाटील, शबाना आझमी, जया बच्चन यांचे आणि त्यांच्या 'नायिकाप्रधान' चित्रपटांचे(मदर इंडिया, आंधी, मिर्च मसाला, अर्थ, भूमिका) अपवाद हे आहेतच. त्यांनी अधिराज्य गाजवलं असं काही म्हणता येणार नाही. हां पण...सशक्त भूमिका आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं असं नक्कीच म्हणता येईल. पण त्याला सुद्धा त्या काळाच्या मर्यादा होत्याच.
पण बहुतांशी गेल्या १५-२० वर्षांत हे सर्व चित्र अजूनच गंभीर होत गेलं. राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, रविना टंडन, शिल्पा शेट्टी, सुश्मिता सेन, करीना कपूर, कतरीना कैफ, प्रियांका चोप्रा(!) आणि अशा बऱ्याच कलाकारांनी अभिनयाला प्राधान्य न देता 'दुय्यम' म्हणजे प्रमुख नायकाच्या सोबत जे काही कमी-जास्त काम करायला मिळेल, त्यातच समाधान मानलं.
अर्थात यामध्ये सुद्धा तब्बू, दिव्या दत्ता, कोंकणा सेन, नंदिता दास आणि काही अभिनेत्रींनी अभिनयाच्या बाबतीत छाप पाडण्याचा मर्यादित (समांतर चित्रपटांच्या प्रेक्षकांपुरता ...डोर, लज्जा, अस्तित्व, चांदनी बार) पण महत्वाचा प्रयत्न देखील केला. या कालावधीत... हे चित्र ठळक रीतीने दिसून येईल, चित्रपट जसा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्याचा तसाच तो 'अभिनेत्रीचा' सुद्धा ! , असं भविष्यात म्हणलं जाईल असं कोणाला वाटत देखील नव्हतं अथवा त्यावेळी असा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नसेल.
पण जर कथेत कुठे ट्विस्ट येणारचं नसेल तर मग त्यात काय मजा? 
हे चित्र काहीसं का होईना पण बदलण्यासाठी १० जून २००५ पर्यंत वाट पाहावी लागली. एकता कपूरच्या 'हम पांच' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी, केरळ मधून आलेली 'ती', हिंदी चित्रपट सृष्टीची गणितं आणि व्याख्या दोन्ही बदलून टाकेल, एक नवा अध्याय सुरु करेल, असं तिला स्वतःला काय, कोणाला वाटलं देखील नव्हतं.
ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं...असं काही मात्र इथं मुळीच झालं नाही. हा कीर्ती आणि प्रसिद्धी मिळण्याचा प्रवास देखील तितकाच खडतर आणि महत्वाचा. तिच्या बॉलीवूड मधील प्रवासाचा(चित्रपटाला धरूनचं) उत्कंठावर्धक असा आढावा घेऊया.
विद्या बालन...
'हम पांच' ही मालिका पाहिल्यानंतर विधु विनोद चोप्रा यांना आपल्या आगामी चित्रपटात विद्यालाच कास्ट करायचं होतं. पण मग प्रत्यक्षात तिला पाहिल्यानंतर हीच का ती ? असा त्यांना प्रश्न पडला. त्यानंतर मग तब्बल 'सहा' महिन्यांच्या ऑडिशन मधून विद्याचं लॉलिता या प्रमुख भूमिकेसाठी 'परिणिता' या चित्रपटासाठी कास्टिंग झालं.
विधु विनोद चोप्रा मुलाखतींमध्ये नेहमीच सांगतात, विद्या हे सोनं आहे हे मला समजलं होतं. ते फक्त किती चकाकतं, त्याला किती झळाळी येते, हेच फक्त मी त्या सहा महिन्यांमध्ये पाहिलं. बाकी शरत्चंद्र चटोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आणि प्रदीप सरकार(यांच्यासोबत विद्याने सुरवातीच्या काही काळात ऍड फिल्म्स केल्या होत्या) यांनी दिग्दर्शित केलेल्या या म्युजिकल लव्ह स्टोरीने भरपूर यश मिळवलं.
चित्रपटातील गाणी अजूनही रसिकांच्या लक्षात आहेत. बऱ्याच वर्षांनी, संजय दत्त आणि सैफ अली खान असूनही विद्या बालन या नवीन अभिनेत्रीचा 'हा' सिनेमा, अशी सर्वत्र चर्चा सुरु झाली. परिणितासाठी विद्याला 'सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा' पुरस्कार सुद्धा मिळाला. हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवीन, अभिनयाने समृद्ध आणि फ्रेश चेहरा हा चित्रपट देऊन गेला.
पहिलाच चित्रपट हिट झाल्यानंतर विद्या कडे चित्रपटांची लाईन लागली, पण तेंव्हाही चोखंदळपणा दाखवून, आपल्याला हवा तोच आणि तसाच चित्रपट करायचा हे मात्र तिने ठरवलं होतं. त्यावेळी तिने दोन चित्रपट साईन केले, पण काही कारणास्तव ते बंद पडले. परिणिताच्या सुरवातीला   सुद्धा असंच काहीसं झालं होतं. एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी विद्याचं कास्टिंग झालं होतं. पण, चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्यानंतर काहीच दिवसात त्यातील प्रमुख कलाकाराचा अपघात झाला आणि त्या चित्रपटातून (अपशकुन वगैरे अशा काही अंधश्रद्धांमुळे) विद्याला काढून टाकलं होतं. आणि तीच गोष्ट पुन्हा घडली होती. या नैराश्यामध्ये पुन्हा विधु विनोद चोप्रा आणि राजू हिरानी यांनी तिला साथ दिली आणि २००६ मध्ये 'लगे रहो मुन्नाभाई' हा ब्लॉकबस्टर दिला.
लगे रहो मुन्नाभाई म्हणलं की पहिल्यांदा आठवतात ते गांधीजी आणि मुन्नाभाई (संजय दत्त). पण या दोघांच्या बरोबरच 'गुड मॉ...र्निंग मुंबाई' अशी ती रेडिओ जॉकी जान्हवी (विद्या) ची हाक मात्र अजून ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
त्यानंतर २००७ मध्ये विद्याचे ४ चित्रपट आले. एकलव्य: द रॉयल गार्ड, सलाम ए इश्क, हे बेबी आणि भूल भुलैय्या.
विधु विनोद चोप्रानी हाताला लागलेला हिरा काही सोडलेलाच नव्हता. 'एकलव्य: द रॉयल गार्ड' हा त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि विद्याला कास्ट केलेला तसा पहिलाच चित्रपट. या चित्रपटात तर कलाकारांची फौजच होती. अमिताभ बच्चन, सैफ अली खान, बोमन इराणी, संजय दत्त आणि विद्या. या चित्रपटात अमिताभ सर आणि हो! विद्यासुद्धा भाव खाऊन गेले. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश जरी मिळालं नसलं तरी तो परदेशात आणि फिल्म फेस्टिव्हलमध्ये चांगलाच नावाजला गेला. 'सलाम ए इश्क' हा सुद्धा एक वेगळा प्रयोग होता. सहा वेगवेगळ्या कथा यात मांडल्या होत्या पण यात दिग्दर्शक निखिल अडवाणीला फारसं यश नाही आलं. तरी सुद्धा विद्या आणि जॉन अब्राहाम यांची कथा मात्र या सर्वात वेगळी आणि वरचढ ठरली. त्यानंतर आलेला 'हे बेबी' हा चित्रपट वेगळ्याच धाटणीचा पण काहीसा फसलेला.
'भूल भूल्लैया' मात्र २००७ मध्ये आलेला विद्याचा सर्वोत्तम. प्रियदर्शन ने दिग्दर्शित केलेल्या आणि चांगल्या असलेल्या चित्रपटांपैकी तो एक. मूलतः दाक्षिणात्य चंद्रमुखी या चित्रपटाचा हा रिमेक. पण मूळ चित्रपटापेक्षा अधिक प्रभावी आणि तो केवळ विद्याने साकारलेल्या मंजुलिकामुळेच. सायकोलॉजिकॅल थ्रिलर आणि हॉरर अशा जॉनर मध्ये मोडणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील या जॉनर मधील सर्वोत्तम असाच. विद्याने साकारलेली (स्प्लिट पर्सनॅलिटी) अवनी आणि मंजुलीका अप्रतिमच होत्या. तिला त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या पुरस्काराने सुद्धा गौरवले गेले. 'मेरे डोलना' हे अतिशय सुंदर रित्या चित्रीत झालेलं गाणं अजूनही डोळ्यासमोर उभारतं.
यानंतर २००८ मध्ये, 'हल्ला बोल' आणि किस्मत कनेक्शन हे चित्रपट प्रदर्शित झाले. हल्ला बोल हा तब्बल ४ तास २ मिनिटांचा 'हार्ड हिटिंग' सोशल ड्रामा होता. विद्याला काही अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत खास असा रोल नव्हता (पण त्यातील तिचा एक प्रेस सिन लक्षात राहण्यासारखाच). पण विषयाच्या वेगळेपणामुळे आणि खणखणीत संवादांमुळे राजकुमार संतोशींचा चित्रपट बऱ्यापैकी चालला.
'किस्मत कनेक्शन' मात्र विद्याच्या चुकलेल्या चोईसपैकीच एक. विषय काहीसा वेगळा होता, पण शाहिद-विद्या ही जोडी मात्र काही प्रेक्षकांनी स्वीकारली नाही. आणि त्याहून चित्रपटाचं चांगला नसल्याने, तो काही चालला नाही.
पण आता हे २००९ चं वर्ष तिच्यासाठी सर्व बॉलिवूड मधील संकल्पनाच बदलून टाकणार होतं. तिच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरु होणार होतं. प्रेक्षकांना एक नवीन विद्या पाहायला मिळणार होती. 
२००९ मध्ये आर. ब्लकिंचा 'पा' हा चित्रपट आला. नेहमीच आगळा-वेगळा विषय हाताळण्याची सवय, यशा-अपयशाची चिंता नसणारा हा हिंदीतील खूपच वेगळा दिग्दर्शक. चिनी कम हा त्याचा पहिला आणि खूपच वेगळ्या विषयाला हात घालणारा, अमिताभ आणि तब्बू ही जोडी पडद्यावर यशस्वी पणे साकारणारा हा दिग्दर्शक. आता याच्या पा या दुसऱ्या चित्रपटकडून सुद्धा अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. त्याचं प्रमुख कारण अमिताभ-अभिषेक ही वडील-मुलाची जोडी या चित्रपटामध्ये मुलगा आणि वडील अशी दिसणार होती. आणि दुसरं कारण म्हणजे अमिताभ यांनी घेतलेली शारीरिक मेहनत आणि त्यांचा मेकअप. पण चित्रपटामध्ये विद्या सरप्राईज पॅकेज म्हणून वर्क झाली. तिचे काम सर्वानाच खूप आवडले. तिची डॉक्टर आणि ऑरो (अमिताभ सर) ची आईच्या भूमिकेतील सहजता सर्वानाच भावली. मला तरी वैयक्तिक तिचे काम बच्चन यांच्यापेक्षा आवडले (माझ्यासारखे अजूनही असतील यात शंका नाही) या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्म फेअर आणि प्रियदर्शनी धरून ४ अवॉर्डस मिळाले. पा मधील तिचा गार्डन मधील एकदम छोटासा एक संवाद अजूनही मला खूपच आवडतो... 
एक स्त्री जेंव्हा खेळणाऱ्या ऑरो कडे पाहून डॉ. विद्याला जेंव्हा त्याचबद्दल विचारते...
: हॅलो
डॉ. विद्या: हाय
: युअर सन ?
डॉ. विद्या: याह
: क्या हुआ है इसको ?
डॉ. विद्या: It is a chromosomal Glitch. हर इन्सान में एक जेनेटिक कोड होता है। chromosome, ATGC को मिला कर हर शरीर में ३ बिलियन ऐसे कोड होते है। कभी कभी जेनेटिक म्युटेशन की वजाह से ३ बिलियन में से किसी एक कोड में अगर T की जगह अगर गलती से C लेता है तो  उसे 'ऑरो' कहते है। 'लकी बॉय... हं।'
२०१०...
हे वर्ष बॉलिवूड मध्ये तीनचं चित्रपटांनी खऱ्या अर्थानं व्यापून टाकलं. उडान, पिपली लाईव्ह आणि इश्किया.
विशाल भारद्वाजच्या कॅम्पमधील अभिषेक चौबे हा नव्या पिढीच्या आणि नव्या दमाचा दिग्दर्शक. त्याने दिग्दर्शित केलेला इश्किया हा मास्टरपिस.
गावठी गुंडांचा बेरकीपणा, गावरान लैंगिकतेचा रोखठोक आविष्कार आणि उत्तर भारताच्या ग्रामीण भागातील देशी माफियागिरीला इरसाल विनोदाची फोडणी देऊन साकारलेला हा सिनेमा. नसिरुद्दीन शाह आणि अर्षद वारसी यांच्या सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अदाकारीपैकी एक इथे पाहायला मिळते. त्यातील विद्याला विसरण्याचं धाडस ते कोण करणार ? ती ज्या हुशारीने आणि कमालीने कृष्णा साकारते, ते अप्रतिमचं. तिच्या त्या अदाकारीसमोर नसिर भाई आणि अर्षद यांचा अभिनय फिका पडतो, हे नव्याने सांगायची काही गरज नाही. दिल तो बच्चा है जी मध्ये गीतकार गुलजार आणि संगीतकार भारद्वाज यांनीही चित्रपटाचा मूड झक्कास पकडला होता. चित्रपटाला भरपूर यश मिळालं. कौतुक आणि पुरस्कारांचा वर्षाव झाला. विद्याने सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्व पुरस्कार पटकावले, हे नवीन सांगायला नको.
विद्याची गाडी तेजीतच होती. प्रेक्षक आणि समीक्षक दोहोंकडून प्रशंसा होत होती. पण अजूनही हे यश बॉलिवूड च्या मेन्स्ट्रीम चित्रपटांसाठी मिळत नव्हतं. त्याच्यासाठी तिला (परिणिता आणि भूल भूल्लैया पासून) ६ वर्षांची वाट पाहावी लागली. २०११ मध्ये मध्ये तिचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. नो वन किल्ड जेस्सीका आणि द डर्टी पिक्चर.
राज कुमार गुप्ता या दिग्दर्शकाचा 'नो वन किल्ड जेसिका' हा चित्रपट दिल्लीतील जेसिका हत्याकांडावर आधारित.
विषय तसा दाहक आणि ज्वलंत. आणि ज्या इंटेन्सिटी ने विषय चित्रपटात हाताळला गेला, तो कमालीचा प्रयत्न होता. 
जेसिकाची एका पब मध्ये सर्व उपस्थितांच्या समोर रात्रीची हत्या झाल्यावर तिची बहीण सब्रीना (विद्या) हिने न्यायासाठी दिलेला लढा, साक्ष देताना सर्वांनी घेतलेली माघार आणि मग मीरा (राणी) या न्यूज रिपोर्टरचा मिळालेला खंबीर आधार असं काहीसं वर्णन करता येईल. राज कुमार गुप्ता भारताच्या 'सिस्टम'वर ताशेरे ओढताना मागे-पुढे पाहात नाही. बहिणीची हत्या झाल्यावर त्वेषाने पेटून उठलेली, नंतर सिस्टीमचाचं बळी ठरलेली, धीर खचलेली आणि पुन्हा उभारलेली सब्रीना विद्याने कमालीची साकारली आहे. बोल्ड आणि डायनॅमिक मीरा (राणी) ने सुद्धा तिला तितकीच तोडीची साथ दिली आहे. चित्रपटावर समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून वारेमाप कौतुक झालं. राणी मुखर्जीने सहाय्यक अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले. विद्याला सुद्धा उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन जाहीर झालं. पण त्याचं पुरस्कारांमध्ये रूपांतर काही झालं नाही. त्या वर्षीची सारी गणितं डिसेम्बर महिन्यामध्ये सुटणार होती.
२ डिसेम्बर २०११...
तो दिवस आला होता. तब्बल एक-दिड वर्षांपासून तुफान चर्चा आणि प्रसिद्धी मिळवलेला 'द डर्टी पिक्चर' चित्रपटगृहांमध्ये झळकणार होता.
विद्या बालन ही एकमेव आदर्श (भारतीय पोशाखामध्ये वावरणारी) अशी अभिनेत्री. आता अशी ओळख निर्माण झालेली विद्या... 'सिल्क स्मिता' या दाक्षिणात्य, वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या, बी ग्रेड चित्रपटांच्या हुकुमी राणीच्या, आयुष्यावरील चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्येचं दिसणार म्हणजे कमालीचा चर्चेचा विषय होता. 
'ऊह ला ला' हे बप्पी लेहरीचं चित्रपटातील गाणं लोकांनी डोक्यावरचं घेतलं होतं. टीव्ही एफ एम, वराती, पब म्हणजे जिथे कुठे असेल तिथे, सर्व ठिकाणी हे एकंच गाणं तब्बल ५-६ महिने ऐकू येत होतं. 
'एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट' हा डायलॉग तर एवढा फेमस झाला होता की विचारायलाच नको. चित्रपटाची चर्चा तिकीट खिडकीवरील कलेक्शनमध्ये रूपांतरित झाली.
CBFC बोर्डचं A सर्टिफिकेट मिळून सुद्धा, या पहिल्या स्त्री प्रधान चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला.  
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर मिलन लुथ्रीया या टॅक्सी नं. ९२११ आणि वन्स अपॉन अ टाइम... या उत्तम चित्रपटांचा, वेगळी वाट निवडणारा, हातचं काहीसुद्धा न राखणारा, एक गुणी दिग्दर्शक.
तो चित्रपट दिग्दर्शित करणार आणि विद्या, नासिर भाई, इम्रान, तुषार(!) आणि राजेश शर्मा ही तगडी कास्ट असताना चित्रपट चांगला असणार, हे गृहीतच होतं. पण ओळखीची नसलेली पटकथा, रजत अरोराचे खटकेबाज संवाद, सर्वच कलाकारांचे उत्तम अभिनय, विद्याची नासिर भाई, तुषार आणि इम्रान बरोबरची केमिस्ट्री, विशाल-शेखर यांचं संगीत, परफेक्ट बॅकग्राउंड स्कोअर, तो काळ उभारण्यात आलेलं यश आणि मिलन लुथ्रीयाचा डिरेक्शनल अप्रोच, या सर्वांमुळे हा बायोपिक एका वेगळ्याचं उंचीवर पोहोचला. 
बोल्डनेस आणि अश्लीलता यामधील अंधुक रेषेवर कसरत करत, विद्याने सिल्क स्मिताचा खळबळजनक प्रवास, कमालीच्या सहजतेने साकारला. केवळ तिच्या अभिनयामुळे चित्रपट एक अढळ स्थान पोहोचला. चंदेरी दुनियेचं आकर्षण असलेली रेश्मा, चित्रपटसृष्टीमध्ये स्थान मिळवण्यासाठी असलेली तळमळ, केवळ एका गाण्यामुळे मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, धूम्रपान आणि मद्यपानाच्या आहारी गेलेली एक डान्सर, फ्रस्ट्रेशन आणि खोट्या प्रसिद्धीच्या चक्रव्युवात फसलेली आणि आभासी प्रेमाने विटलेली सिल्क विद्याने कमालीची साकारली. तो तिच्या कारकीर्दीतील माईल स्टोन ठरली.
उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गायिका(श्रेया), उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (नासिर भाई), उत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विद्या) असे चित्रपटाला २५+ पारितोषिके मिळाली.
'चेरी ऑन द टॉप' म्हणून विद्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला आणि तिच्या अथक प्रयत्नांचं सार्थक झालं.
२०११ चं वर्ष विद्यासाठी, बॉलिवूड साठी आणि हो प्रेक्षकांसाठी छानच गेलं होतं. पण २०१२ मध्ये सुद्धा तेच पुन्हा होणार होतं. 
महिला दिनाच्या निमित्ताने 'कहानी: द मदर ऑफ स्टोरी' प्रदर्शित झाला. जे चित्रपटाचं पहिलं समीक्षण आलं होतं, ते मला अजूनही आठवतंय... 'बाप ऑफ थ्रिलर' अशा चपखल शीर्षकाचं ते परीक्षण. सुजॉय घोष या दिग्दर्शकाचा हा चित्रपट.
चित्रपटामध्ये दोनच प्रमुख पात्रं... बिद्या आणि कोलकाता.
या दोनच गोष्टींभोवती चित्रपट असा काही फिरतो आणि प्रेक्षकांना त्यामध्ये असा काही अलगद रित्या खेचतो, ते अवर्णनियचं. आपल्या नवऱ्याची मिसिंग कंप्लेंट, परदेशातून घेऊन आलेली प्रेग्नेंट बिद्या, आणि त्या प्रकरणाचा होणारा 'अतिशय' उत्कंठावर्धक (आणि संपूच नये असा वाटणारा) खुलासा असं काहीसं चित्रपटाचं थोडक्यात वर्णन.
कहानी हा चित्रपट सस्पेन्स, थ्रिलर या जॉनर मध्ये मोडणारा, पण त्याच जॉनर च्या मांडणीला छेद देऊन, तो प्रेक्षकाला प्रेग्नेंट बिद्याच्या इमोशनल अँगल मधून असा काही जोडतो की ती 'नाळ' चित्रपट प्रदर्शित होऊन जरी ४ वर्षे ओलांडून गेली असली तरी तशीच आहे. अंगावर शहारे येणारे प्रसंग, उत्कंठावर्धक वळणे, प्रसंगी ऍक्शन या सर्व संकल्पनांबरोबरच प्रेक्षकांची चित्रपटाशी होणारी इमोशनल अटॅचमेन्ट हीच कहानी ला प्रेक्षक, समीक्षकांच्या 'ऑल टाइम फेव्हरेट' मध्ये स्थान मिळवून देते. एकूणच चित्रपटाची बंदिस्त आणि एकमेकात गुंफलेली पटकथा, कोलकाता शहराचा एक पात्र म्हणून केलेला कमालीचा वापर, सुजोयचे दिग्दर्शन आणि विद्याचा अभिनय चित्रपटाला शेवटपर्यंत चढत्या आलेखाप्रमाणे घेऊन जातात.
चित्रपटाचा क्लायमॅक्स, ट्विस्ट एंडिंग प्रकारात मोडणारा, प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकणारा, चित्रपटामध्ये घडलेली प्रत्येक घटना आठवायला भाग पाडणारा असल्यामुळे तो मस्तच वर्क होतो.
हा चित्रपट पाहण्यात, त्यामधील गोष्टींचा स्वतःशीच तर्क लावण्यात, त्या गोष्टी एका समान धाग्याने जोडण्यात जी मजा आहे ना, इथे लिहीत बसण्यात नाही. 
कहानी ला सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे सर्व महत्वाचे पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार या वर्षीसुद्धा सर्वांनाच अपेक्षित होता, पण तस घडलं नाही.
या चित्रपटाखेर विद्याकडे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे देशा-विदेशातील २१व्या शतकातील सर्वात जास्त म्हणजे तब्बल ४८ पुरस्कार आहेत. 
या चित्रपटानंतर तिचं सिद्धार्थ रॉय कपूर सोबत विवाह झालं. आत्तापर्यंतच्या सर्व बाबतीत अपवाद राहिलेली विद्या मात्र लग्नानंतर कारकिर्दीला ब्रेक लागतो, या गोष्टी साठी मात्र दुर्दैवाने😢 अपवाद ठरली नाही. त्यानंतर आलेले बॉबी जासुस, घनचक्कर, शादी के साईड इफेक्ट्स तीनही चित्रपट फ्लॉप झाले. हमारी अधुरी कहानी हा चित्रपट थोडाफार चालला.
घनचक्कर...
द डर्टी पिक्चर मध्ये हिट झालेली विद्या- इम्रानची जोडी आणि नो वन किल्ड जेसिकाचा, राज कुमार गुप्ता हा दिग्दर्शक. लेझी लाड, झोलूराम, घनचक्कर बाबू या हटके गाण्यांमुळे चित्रपट बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात होता.
ब्लॅक कॉमेडी या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटाचे संमिश्र प्रतिक्रियांनी स्वागत झालं. बँकेतल्या चोरीनंतर आणि स्मृती भ्रंश झालेल्या इम्रानच्या आणि पर्यायाने त्याच्या पत्नी विद्याच्या प्रवासाची गोष्ट अनपेक्षित वळणे घेत पुढे जाते. विद्याने साकारलेली भडक, फॅशन ऑब्सेस्ड, बोल्ड पंजाबी स्त्रीची व्यक्तिरेखा धम्माल होती. रोलर कोस्टर डार्क कोमेडीचा हा प्रकार मी मस्त एन्जॉय केला. माझ्या फेव्हरेट कॉमेडी चित्रपटांपैकी हा नेहमीच आहे.
२०१४ मध्ये आलेल्या बॉबी जासुस ची पहिली फिमेल डिटेक्टिव्ह ही संकल्पना जरी चांगली असली, तरी चित्रपट ढिसाळ पटकथेमुळे काही म्हणावा तितका परिणाम साधू शकला नाही. 
विद्याचा बॉबीच्या भूमिकेतील १२ अवतारांतील सहज वावर, ही एकचं चित्रपटाची जमेची बाजू ठरली. आपल्याकडे चित्रपट जर प्रभावी असेल तरंच त्यातील कलाकारांकडे त्यांच्या अभिनयकडे लक्ष जाते आणि नेमके हेच घडले. आणि विद्याच्या चोख कामाकडे सर्वानी पाठ फिरवली. 
त्यानंतर २०१४ मध्येच आलेला तिचा दुसरा चित्रपट म्हणजे शादी के साईड इफेक्ट्स. फरहान अखतर आणि विद्या यांची केमिस्ट्री खरंच परफेक्ट होती. दोघांनीही आपापली भूमिका छान साकारली होती. पण तरीसुद्धा हा फ्रेश, कॉमेडी चित्रपट पटकथेचा बळी ठरला.
२०१४ मध्ये चित्रपटांमध्ये जरी काहीशी निराशा झाली असली, तरी विद्याला भारत सरकारने 'पद्मश्री' हा 'किताब बहाल केला. तिने बॉलिवूड मध्ये सुरु केलेला स्त्री प्रधान चित्रपटांचा नवीन अध्याय, तिचा प्रेटेक चित्रपटातील सहज-सुंदर अभिनय आणि सामाजिक भान या सर्वांसाठी ती सर्वोत्तम पावती होती.
२०१५ मध्ये आलेल्या विद्या, राजकुमार आणि इम्रान च्या हमारी अधुरी कहानी कडून सर्वांच्या अपेक्षा होत्या. मोहित सूरी चित्रपट दिग्दर्शित करणार होता. मिथुन ने दिलेले संगीत तर त्या वर्षातील सर्वोत्तम असंच होतं. पण पुन्हा चित्रपटाने निराशा केली. 'खंबीर आणि ताकदीची' अशी बॉलिवूड मध्ये विद्यामुळेच होणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखांच्या बदलाला पुन्हा जुन्या वळणाने दिलेला छेद, मात्र काही रुचला नाही. 
केवळ कलाकारांचा अभिनय, विलोभनीय सिनेमॅटोग्राफी, उत्तम संवाद आणि संगीत याच्या जोरावर चित्रपट थोडाफार चालला, पण ते यश विद्याच्या स्टेटस ला शोभणारं नव्हतं.
एक अलबेला हा भगवान दादांच्या आयुष्यावरील चित्रपटात  विद्याने 'गीता बालीं'ची भूमिका छोटी पण अतिशय सुरेख साकारली. तिच्या अदाकारींमुळे चित्रपटाच्या इतर बाजू झाकोळल्या जातात. पण चित्रपटाच्या चुकीच्या प्रोमोशन मुळे हा महत्वाचा चित्रपट कौतुकापासून वंचित राहिला.
पण आता हा बॅड पॅच संपेल अशी 'आशा' आहे. आणि ती आशा सार्थ ठरवण्यासाठी अगदी येत्या आठवड्यातचं 'कहानी २' येतोय.
सुजॉय आणि विद्याची जमलेली केमिस्ट्री, चित्रपटाचा इंटेन्स आणि ग्रीपिंग ट्रेलर, श्रवणीय गाणी, सर्वत्र असलेली चित्रपटाची चर्चा या सर्वांमुळे कहानी २ निराशा अजिबातच करणार नाही असं ठाम वाटतंय. विद्या 'दुर्गा राणी सिंगच्या' भूमिकेतून पुन्हा चांगल्या चित्रपटांमधून फॉर्मात येईल असंच वाटतंय.
विद्याचे हे यशस्वी पुनरागमन होवो यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!💐💐💐
***
ती जेंव्हा जेंव्हा पडद्यावर झळकते, तेंव्हा तिचा प्रेझेन्स खुपचं भावतो. आपण तिचे डाय हार्ड फॅन आहोत, या बद्दल स्वतःचाच अभिमान वाटतो. तिचं विद्या बालन म्हणून असलेलं अस्तित्व कोणत्याच भूमिकेमध्ये डोकावत नाही. इतरांची फिकीर न करता कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हान स्विकारण्यासाठी तिची नेहमीच तयारी असते. मिसेस परफेक्शनिस्ट, फिमेल खान या सर्व उपमा तिच्या साठी सार्थ ठरतात. चित्रपट कसाही असो, ती स्वतःची भूमिका चोख करते. केवळ अभिनयामुळेचं चर्चेत असलेली ही एकमेव अभिनेत्री. 'प्रभाव' म्हणजे काय हे तिच्याकडे पडद्यावर पाहिल्यावरच समजते. संजय दत्त, सैफ अली खान, अक्षय कुमार ते अगदी नावाझुद्दीन, अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शाह यांच्यासारखे सर्वच दिग्गज तिच्या समोर अक्षरश: फिके पडतात. सौंदर्याच्या बाबतीत, बी टाऊनमध्ये ती केवळ एकटीच 'भारतीय नारी' वाटते. झगमगत्या इंडस्ट्रीमध्ये ती ज्या साधेपणाने वावरते, ते सुद्धा कौतुकास्पदंच आहे.
'विद्या' नावाचं भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेलं अवीट गोडीचं स्वप्न आहे. जे कधीही विरु नये, असे जाणकारांना वाटते. 
अशा या एकमेव अद्वितीय, सर्वोत्कृष्ट आणि हटके विद्या ला हॅट्स ऑफ !
विद्या 😍😍😍

-आशुतोष 😊

Comments

  1. Nice one loved to read this article and the way you have presented this in Marathi
    Gud one and best of luck

    ReplyDelete
  2. अत्यंत महत्वाचा आणि जबाबदारीपूर्वक घेतलेला आढावा. विद्या माझीही अत्यंत आवडती आहे. ती स्क्रीनवर असली की दुसरं काही पाहावंसं वाटतच नाही. केवळ तिच्या सौंदर्यामुळेच नव्हे, तर तिने कमावलेल्या नावामुळेही. विद्या बालन हे एक 'नो नॉनसेन्स' प्रोडक्ट आहे.
    धन्यवाद !

    - रणजित

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts