दहा चित्रपट, दहा क्लायमॅक्स

आपण जर एखादा नवीन चित्रपट पाहिला तर, समोरची व्यक्ती एक-दोन प्रश्नातच... 'चित्रपटाचा शेवट कसा आहे रे ?' या प्रश्नाकडे आपसूकचं वळते. त्याला चित्रपटाच्या कथेपेक्षा त्याच्या शेवटाचे जास्त आकर्षण असते. एखादा सस्पेन्स चित्रपट पाहताना अथवा पुस्तक वाचताना, जसे शेवटाचे कुतूहल वाटायला लागते, अगदी तसेच ! मग आता हा शेवट खरोखरचं इतका महत्वाचा आहे का ? तर हो ! नक्कीचं आहे.
'चित्रपट कसा असावा ?' असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी विचार करून असं काहीसं उत्तर देईन...
चित्रपटाची सुरुवात प्रॉमिसिंग हवी, चित्रपटाचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असावा आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स (शेवट) हा 'लक्षात राहणारा' !
आज कालचे बरेच चित्रपट सुरुवात प्रोमिसिंग करतात, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला देखील पोहोचते. पण नंतर मात्र त्या अपेक्षांना ते फारसे पात्र ठरत नाहीत. काहींची पटकथा फसते तर काहींचा शेवट.
आता हा शेवट म्हणजेच चित्रपटाचा क्लायमॅक्स फारचं महत्वाचा ! म्हणजे त्या चित्रपटाचा प्रवास काही महत्वाचा नाही, असे होत नाही. पण मग तरीही, प्रेक्षकांच्या मनावर ठळक अशी छाप पाडण्याच्या कामात हा क्लायमॅक्स खूप महत्वाची भूमिका बजावतो.
बॉलीवूड मध्ये सहसा गोड शेवटाची प्रथा आहे. वास्तवाला दूर, कोसावर ठेऊन पटकथा लिहायची आणि मग अपेक्षित असा अगदी गोड, बेचव शेवट करून दिवसेंदिवस चालू असलेल्या प्रथेला धक्का न देता, काय ते सोपस्कार उरकून टाकायचे, असे आपल्या लेखक-दिग्दर्शक द्वयींचे काम.
हॉलिवूड मध्ये मात्र अशी काही नेमलेली प्रथा नाही. ते आपापल्या पद्धतीने वेगळेपण दाखवत असतात. पण या प्रथा नसलेल्या पद्धतींमध्येच एक प्रमुख पायंडा पडला...
'ट्विस्ट एंडिंग' चित्रपटांचा.
हिचकॉक च्या 'सायको'ने ही वेगळीच पण सुखावणारी प्रथा सुरु केली. चित्रपटाचे कथानक एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवायचे आणि प्रेक्षकांच्या सर्व कल्पनाशक्तीला मधोमध छेद देत, त्यांना बुचकळ्यात पाडणारे असे काहीतरी पडद्यावर पेश करायचे अथवा उलगडायचे की तो अवाकचं झाला पाहिजे. सायको नंतर सुद्धा अशा यशस्वी प्रयत्नांमध्ये, द युज्वल सस्पेक्ट्स, फाईट क्लब, सिक्सथ सेन्स, द अदर्स, शटर आयलंड आणि अशी काही नावे हमखास घेता येतील. 
मेमेंटो, रिझर्वायर डॉग्ज, इनसेप्शन, द डीपार्टेड अशा चित्रपटांनी देखील क्लायमॅक्स मध्ये वेगळे आणि उल्लेखनीय अनुभव दिले. आता त्यांचे काही पायंडे पडले नाहीत, हा दूसरा भाग झाला. आजसुद्धा संकेतस्थळांवर फक्त हॉलिवूड चित्रपटांच्या क्लायमॅक्सची चर्चा रंगताना दिसते. 
पण अशा चर्चेपासून हिंदी चित्रपटांचे क्लायमॅक्स मात्र नेहमीच वंचित राहिले. 
हिंदीमध्ये सुद्धा सर्व रीती-रिवाजाच्या चौकटी मोडून केलेले, हटके क्लायमॅक्स आहेतच की. जे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतील. चित्रपटाचे नाव घेतले की लगेचचं त्या चित्रपटातील शेवटची दृश्ये आपल्या डोळ्यासमोर हळुवार अथवा प्रखरपणे येऊन जातील. आपले डोळे सुद्धा वास्तवाची झळ बसल्याने, अश्रूंनी पाणावतील अथवा आनंदाश्रूंनी सुखावतील.
आत्तापर्यंत असा प्रयत्न कधीच झाला नसावा. आणि म्हणूनच अशा काहीशा २१व्या शतकातील 'पाथ-ब्रेकिंग' १० चित्रपटांच्या क्लायमॅक्सचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कथानकाचा हा आढावा...
तारे जमीन पर
हा चित्रपट म्हणजे अबालवृद्धांनी अमाप प्रेम केलेला चित्रपट. २००७ मध्ये आलेला तारे जमीन पर अजूनही प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनात खोलवर अढळ जागा निर्माण करून आहे.
आमिर खान आणि अमोल गुप्ते यांच्या या चित्रपटाने फारचं गहन विषयाला हात घातला आणि अगदी लिलया पेलला. 'Every Child is Special' असा संदेश पोहोचवताना चित्रपट कुठेच कमी पडला नाही. 
आता या चित्रपटाचा क्लायमॅक्स अविस्मरणीय असाच आहे. रहिवासी शाळेतील कला विषयाचे निकुंभ सर(आमीर खान), शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करतात. हॉस्टेल मधून पहाटेच बाहेर पडलेला ईशान आवस्ती(दर्शील सफारी) स्पर्धेला काहीसा उशिराच पोहोचतो. पण मग जेंव्हा तो हातात कुंचला घेतो, तेंव्हा अद्भुत कलाकृती कागदावर उमटते. पहाटे पाहिलेलं तळ्याकाठचं रम्य चित्र असं काही रंगतं की वाह ! आणि दुसरीकडे निकुंभ सर स्वतः ईशान चे तैलचित्र काढत असतात. ईशान जेंव्हा ते निकुंभ सरांनी काढलेलं चित्र पाहतो तेंव्हाच्या त्याच्या आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी विजेता 'विद्यार्थी' आहे, हे ऐकल्यानंतरच्या निकुंभ सरांच्या एक्सप्रेशन, डोळे शांत पणे मिटून आठवत राहाव्यात अशाच !
जेंव्हा वार्षिक परीक्षा संपल्यावर, ईशान चे पालक त्याला न्यायला येतात तेंव्हा गाडीत बसताना... तो जी काही निकुंभ सरांकडे धाव घेतो आणि निकुंभ सर ईशानला ज्या पद्धतीने हवेत झेपावतात ! 
आणि मग सुरु होणारे ते पार्श्वसंगीत...
तू धूप है, झम से बिखर
तू है नदी.. ओ बेख़बर
बह चल कहीं, उड़ चल कहीं
दिल खुश जहाँ.. 
तेरी तो मंज़िल है वहीं..
***
जिंदगी ना मिलेगी दोबारा
नाव वाचल्यावरचं किती छान वाटतं ना. चित्रपट सुद्धा तसाच सहज-सुंदर. झोया अख्तर ने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे तीन मित्रांची गोष्ट.
हे तीन भिन्न स्वभावांचे बालमित्र बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटतात. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातील सर्व समस्या, कामे आणि भूतकाळ यांना पुरता कंटाळला आहे. आणि म्हणून ते सुट्टी साठी स्पेनला जाण्याचा प्लॅन करतात. प्रत्येकाला जे काही आपल्या आयुष्यात भन्नाट असं एकदा तरी करायचंच आहे, ते करण्याची ही शेवटची संधी म्हणून प्रत्येक जण आपापला साहसी खेळ निवडतो. त्यात मग कबीर(अभय) आणि अर्जुन(हृतिक) यांनी निवडलेले स्कुबा डायव्हिंग आणि स्काय डायव्हिंग होतात.
आणि शेवटी इम्रान(फरहान) ने निवडलेला बुल रन नावाचा  सर्वात साहसी(भयानक) खेळ राहतो. प्रत्येक जण या खेळामधून जर आपण जिवंत राहिलो, तर एकमेकांना दिलेलं वचन पूर्ण करणार असं ठरवतात. आणि मग तोपर्यंत संपलेल्या सर्व समस्या, नवीन खुललेलं प्रेम आणि खूप सारं प्रवासातील आणि आयुष्यातील थ्रिल साथीला घेऊन धाव घेतात. आणि इम्रान ची जगण्याची नवी व्याख्या सांगणारी कविता कानी पडते...
दिलों  में  तुम  अपनी  बेताबियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम
नज़र  में  ख़्वाबों  की  बिजलियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम
हवा  के  झोंकों  के  जैसे  आजाद  रहना  सीखो
तुम  एक  दरिया  के  जैसे  लहरों  में  बहना  सीखो
हर  एक  लम्हे  से  तुम  मिलो  खोले  अपनी  बाहें
हर  एक  पल  इक  नया  समां देखें  यह  निगाहें
जो  अपनी  आँखों  में  हैरानियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम
दिलों  में  तुम  अपनी  बेताबियाँ  लेके  चल  रहे  हो
तोह  जिंदा  हो  तुम
***
कहानी
कहानी म्हणजे एका वाक्यात सांगायचे झाले तर...बाप ऑफ थ्रिलर. सुजोय घोष च्या लेखणी आणि कॅमेऱ्यातून उरलेलं हे अद्भुत रसायन आणि त्याला तितक्याच ताकदीची मिळालेली विद्या बालन ची साथ.
तो उभारलेला कोलकाता, शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी, कमालीच्या ताकदीची पटकथा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ट्विस्ट एंडिंग आणि सर्वोत्कृष्ट असाचं क्लायमॅक्स.
नवऱ्याच्या शोधात असणाऱ्या प्रेग्नन्ट बिद्या बागचीचा शोध शेवटाकडे येतो. मिलन दामजी आणि अर्णब बागची यातील गुंता आणि त्यातील थरार टिकवण्यात दिग्दर्शकाला कमालीचं यश येतं. त्या रहस्याचा उलगडा कसा होणार याचा अंदाज प्रत्येक सरसावून बसलेला प्रेक्षक मनामध्ये बांधत असतो आणि त्या सर्वचं अंदाजांना मधोमध छेद देत, एक वेगळीच कहानी सुजोय मांडतो आणि प्रेक्षक वर्ग अवाक होऊन जातो.
कोलकात्यातील दुर्गामातेचा फेस्टिव्ह मूड आणि त्या साऱ्या गर्दीत उलगडणारे हे सत्य, बिद्या आणि मिलन च्या शोधात असणारे सत्योकी आणि खान हे पोलीस, मिलन दामजीचे तिथे येणं, प्रेग्नन्ट बिद्याच्या उदरावर मिलन दामजीने त्वेषाने मारलेली लाथ आणि त्याच नंतर होणारा बिद्याचा अविश्वसनीय प्रतिकार, ते प्रोस्थेटीक पोट, ती हेअर क्लिप, तिचे ते खऱ्या अर्थाने असणारे भेदक डोळे,  आणि त्यानंतर बिद्याने मिलन दामजीवर झाडलेल्या गोळ्या... आजही आठवलं तरी एक वेगळाचं, न भूतो न भविष्यती थरार जाणवतो.
आणि त्यानंतर होणारा रहस्याचा उलगडा, दुर्गामातेचं होणारं विसर्जन आणि अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं एकला चलो रे.. वाह ! वाह ! वाह !
जोदी तोर डाक सुने केउ ना आसे
तोबे एकला चलो रे
तोबे एकला चलो, एकला चलो,
एकला चलो, एकला चलो रे...
(जर कोणी तुझ्याशी बोलत नसेल, 
त्या दिशेकडे पाहून, भयभीत होऊन जर ते पाठ फिरवत असेल
तर हे माझ्या दुर्दैवी मित्रा...
तू त्या मार्गावरून एकट्याने चालण्याचे सामर्थ्य दाखव. जो काही मनातील कोलाहल आहे त्याच्याशी तू स्वतः संवाद साध.)

जोदी केउ कोथा ना कोए
ओरे… ओ ओभागा
केउ कोथा न कोए …
जोदी सोबाई थाके मुख फिराए
सोबाई कोरे भोई
तोबे पोरान खुले …
ओ तुई मुख फूटे तोर मोनेर कोथा
एकला बोलो रे...
(जेंव्हा गडद ढगांनी, निरभ्र आकाश झाकोळले असेल.
जेंव्हा सत्याने असत्याला गिळंकृत केलं असेल.
जेंव्हा हे सारं जग भयभीत होऊन, शस्त्रे म्यान करून बसले असेल...
तेंव्हा तू आशेची अशी ज्योत हो, जी स्वतः तेवत राहून सभोवतालचा संपूर्ण अंधःकार नाहीसा करेल.)
***
रंग दे बसंती
२००६ मध्ये आलेला हा सर्वांगसुंदर चित्रपट. समाजाच्या भिन्न स्तरातून आलेले, व्यसनाधीन झालेले, मस्तीमध्ये आयुष्य जगणारे आपल्या पिढीचे खुशालचेंडू तरुण आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद अशा क्रांतिकारकांच्या खळबळ जनक आयुष्याचा हा प्रवास. 
या मित्रांच्या टोळीमध्ये असणाऱ्या एकमेव सभ्य आणि इंडियन एअरफोर्स मध्ये असणाऱ्या अजय राठोड चा अपघात होतो आणि या मित्रांचे चैनीखोर आयुष्य रातोरात बदलते. या अपघाताचे सूत्रधार असणारे भारतीय नेते आणि सिस्टीम यांच्या विरोधात या तरुणांनी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद यांच्या स्वातंत्र्य लढ्याला समांतर असा हा चित्रपट.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम असाच ! अपघाताशी संबंधित भारतीय नेत्यांची हत्या केल्यानंतर हे सर्व तरुण मित्र कुठेही पळून न जाता एक रेडिओ सेंटर ताब्यात घेतात. आणि घडलेली घटना सर्वत्र  जाहीर पणे सांगून टाकतात. आणि हे सांगितल्यावर पोलीस फोर्स त्या रेडिओ सेंटरला घेरतो आणि गोळीबार सुरु करतो. आणि हा प्रसंग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशीशी आणि आझाद यांच्या वर होणाऱ्या गोळीबाराशी असा काही संकलन करून जोडला जातो की तो पाहताना आपल्याला स्वतःला आपल्याच हृदयाचे ठोके जाणवले नाहीत तर
नवलंच. मृत्यूला बेधडक सामोरे जातानाचे त्यांचे हसू आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू आणते. 
नंतर, त्यांच्या मैत्रीणीच्या कल्पनेमध्ये, सर्व मित्र कायम जमतात त्या ठिकाणी लहानपणीचे भगतसिंग आपल्या वडिलांना रोपांच्या बिया पेरण्याऐवजी बंदुकीच्या गोळ्या पेरा असे सांगतात. आणि हे पाहून होणारे तरुण मित्रांचे स्मित हास्य आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची अविश्वसनीय ताकद देऊन जाते. चित्रपट पडद्यावर संपतो पण हे गीत मनामध्ये रुंजी घालते...
ए साला...
अभी अभी हुआ यकीन
की आग है मुझ में कही
हुई सुबहा में चल गया
सूरज को में निगल गया
रु-बा-रु रोशनी है ।
जो गुमशुदा सा ख्वाब था
वोह मिल गया
वोह खिल गया
वोह लोहा था, पिघल गया
किछा किछा मचल गया
सितार मे बदल गया
रु-बा-रु रोशनी है ।
***
अगली 
अनुराग कश्यप हे शब्दश: हिंदी चित्रपट सृष्टीमधील घोंघावणारं वादळ. तो कधी कोणता विषय समोर घेऊन येईल आणि तो कोणत्या पद्धतीने मांडेल हे नेहमीच पाहण्यासारखं असतं. 
२०१४ च्या अगदी शेवटी शेवटी आलेल्या चित्रपटाने फारसं यश जरी मिळावलं नसलं, तरी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांना प्रचंड अस्वस्थ केलं.
हरवलेल्या मुलीची तक्रार घेऊन तिचे सावत्र वडील पोलिसांकडे जातात. मग तिथून पुढे तिच्या शोधासाठी मागे लागलेले तिचे पोलीस अधिकारी(वडील), भ्रष्ट पोलीस यंत्रणा, पैशासाठी कोणत्याही थराला पोहोचणारी मानवी प्रवृत्ती, परिस्थितीनुसार बदलत जाणारी नाती, नात्यांमधील गुंतागुंत, भीषण गरिबी, आत्मसन्माना साठीचे हेवेदावे या साऱ्यावर अगली असा काही भाष्य करतो, की सभोवतालच्या समाजाचं अति गडद चित्र अगदी नकोसं वाटतं. 
हा मुलीच्या शोधाचा प्रवास असा काही या नाते संबंध, पैशांची अफरातफर आणि भ्रष्ट यंत्रणा यांचा बळी ठरतो.
आणि क्लायमॅक्स ला जे काही सत्य समोर येतं, ते पाहून तर अस्वस्थतेचा कहर होतो. ती हरवलेली मुलगी एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अत्यंत वाईट अवस्थेमध्ये सापडते. काही वेळातंच तिथे पाऊस येतो. पण हे जळजळीत वास्तव या पावसाच्या थेंबानी शांत होणारं नसतं...
क्या वहाँ दिन है अभी भी 
पापा तुम रहते जहां हो 
औस बन के मैं गिरूंगी 
देखना तुम आसमां हो 
टीम के टूटे कनस्तर से ज़रा बूंदी चुराकर 
भागती है कोई लड़की 
क्या तुम्हें अब भी चिढ़कर 
फर्श अब भी थाम ऊँगली 
साथ चलता है क्यों पापा ?
भाग के देखो रे आगन 
भी मचलता है क्या पापा ?
***
अ वेन्सडे
भारतीय चित्रपट सृष्टीतील गेलं दशक ज्या काही मोजक्या चित्रपटांनी ओळखलं गेलं त्यात नीरज पांडेच्या अ वेन्सडे चं नाव अग्रक्रमी येईल. अतिशय बंदिस्त पटकथा, चित्रपटाचा प्रचंड वेग, संवाद, अनुपम खेर-नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय आणि चित्रपटाचा अनपेक्षित क्लायमॅक्स यामुळे चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.
दहशतवादाला आणि रोजच्याच धकाधकीला कंटाळलेला 'स्टुपिड कॉमन मॅन' एकदमचं आर.डी.एक्स. घेऊन हजर होतो म्हणल्यावर काय...
ट्रेन बॉम्ब ब्लास्ट मध्ये सहभाग असलेल्या अतिरेक्यांना मारल्यानंतर प्रेक्षकांना बसणारा धक्का आणि त्यानंतरचा स्टुपिड कॉमन मॅन(नसिरुद्दीन शाह) आणि प्रकाश राठोड(अनुपम खेर) यांच्यातील संवाद म्हणजे पर्वणीचं !
त्यानंतर जेंव्हा प्रकाश राठोड, स्टुपिड कॉमन मॅन ला भेटतात तेंव्हाचा केवळ दोन ओळींचा संवाद, वास्तविकता, मानसिकता आणि दहशतवाद यावर असे काही ताशेरे ओढतो की काय बोलावे...
प्रकाश राठोड: आय एम प्रकाश राठोड.
स्टुपिड कॉमन मॅन: आय एम...
(प्रकाश राठोड: उसने मुझे अपना नाम बताया। लेकीन में वो नाम किसीको बता नही सकता। इन्सान नाम मे मजहब ढुंढ लेता है। हम सब जानते थे, की आम आदमी परेशान है इन सब चिजोन्से। लेकीन एक आम आदमी, ए रास्ता भी ले सकता है, ए अंदाजा बिलकुल नही था। One Common Man had the Guts.)
***
मुंबई मेरी जान
                  
२००६ मध्ये झालेल्या बोंब ट्रेन ब्लास्ट वर अगदीच वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा हा चित्रपट. हा ट्रेन ब्लास्ट झाल्यानंतर समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४-५ व्यक्तींच्या आयुष्यात कोणते बदल झाले, यांचा घेतलेला हा आढावा.
त्यामध्ये मग रुपाली जोशी(सोहा अली खान) ही एक न्युज रिपोर्टर आहे, निखिल अग्रवाल(आर माधवन) हा रोजचा ट्रेन ने प्रवास करणारा एम्प्लॉयी आहे, सुरेश(के के मेनन) हा नोकरीसाठी झडणारा इंजिनीअर आहे, सुनील कदम(विजय मौर्य) हा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा आणि या सर्व गोष्टी स्वीकारलेला तुकाराम(परेश रावल) हे दोन पोलिसात आहेत, थॉमस(इरफान) हा एक चहावाला आहे.
ट्रेन ब्लास्ट झाल्यानंतर, प्रत्येक जण येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातो. प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य कमालीचे बदलून जाते. रुपाली जोशीला स्वतः जिथे काम करते त्याच मिडियाचं नवीनंच चित्र दिसून येतं. निखिल अग्रवाल ला ट्रेन मध्ये असणारी नवीन माणसं आणि आजूबाजूचं विस्कळीत झालेलं जीवन कमालीचं अस्वस्थ करून जातं. सूरेश ला दिसणाऱ्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीबद्दल संशय वाटू लागतो. अगदी हे सारे फक्त रफींचीच गाणी ऐकणार, इथपर्यंत तो येऊन पोहोचतो. सुनील कदम तर परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतात. थॉमस मात्र बदललेल्या परिस्थितीचा आणि लोकांच्या मनातील भीतीचा वेगळाच फायदा उठवतो.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणजे आत्तापर्यंतचा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात धाडसी प्रयत्न.आता सर्वांनीचं परिस्थितीला स्वीकारलं आहे. सर्वांचे गैरसमज, तेढ दूर झाले आहेत. आपल्या चुकांची त्यांना जाणीव झाली आहे. आणि मग शेवटी ब्लास्ट मध्ये निधन झालेल्या प्रत्येकासाठी आदरांजली म्हणून सर्व मुंबई ५ मिनिटांसाठी स्तब्ध राहते आणि त्याचा कमालीचा पडसाद म्हणून चित्रपट गृहातील प्रत्येक प्रेक्षक सुद्धा आपोआप उभा राहतो. आणि किशोर दांचं हे गाणं कानावर पडतं...
ए दिल है मुश्किल जीना यहा
जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान
ए दिल है...
कही बिल्डिंग, काही ट्रामे
कही मोटर, कही मिल,
मिलता हैं यहा सब कुछ
इक मिलता नही दिल
इन्सान का नही कही नाम-ओ-निशा
जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान
ए दिल है...
***
आखों देखी
रजत कपूर ने दिग्दर्शित केलेला आंखों देखी हा Absolute Gem ! आपल्या आजूबाजूचे सारे विश्व आभासी आहे, आपल्या डोळ्याला जे काही दिसेल ते आणि फक्त तेचं खरं आहे, वास्तव आहे, असं मत असलेल्या बाऊजींचा(संजय मिश्रा) आयुष्याकडे पाहण्याचा वेगळाचं दृष्टिकोन म्हणजे आंखों देखी. या चित्रपटाचं कथानक 'पाहण्यात' जो अनुभव आहे, तो सांगण्यात नाही. 
प्रत्येक शक्य असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधण्याचा ध्यास घेतलेले, जे काही आजूबाजूला घडत आहे त्या सर्वांचा स्वतः अनुभव घ्यावा या ध्येयाने झपाटलेले बाऊजी बऱ्यापैकी सर्वचं गोष्टी पडताळून बघतात.
एक दिवस आपल्या पत्नीला घेऊन ते सुट्टीला जातात. रात्री अशाच गप्पा मारत असताना, आपण हवे मध्ये उडण्याचा अनुभव कुठे घेतला आहे? असा प्रश्न पत्नीने केला असता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी बाऊजी भल्या पहाटे एका कड्यावर पोहोचतात.
कुछ अनुभव अभी बाकी है।
जो कि सिर्फ सपनों मे भोगे थे...
जैसे की ये सपना मुझे बार बार आता था
की में हवा मे तैर रहा हूं।
नही उड रहा हूं।
पंछी के जैसे...
असं म्हणून बाऊजी त्या कड्यावरून खोल दरीत उडी मारतात. आणि ती उडी जीवनाचं सार सांगून जाते. मारलेली उडी म्हणजे नवीन बाळाचा जन्मचं. ती उडी मारल्यानंतर जो काही आक्रोश होतो, तो म्हणजे त्या बाळाचं पहिलं रडणं. आणि तो आक्रोश थांबतो...
लेकीन ये सपना नही वास्तविकता है।
ये हवा जो मेरे चेहरे को चुम रही है...
ये सांय सांय की आवाज मेरी कानो मे...
यही यथार्थ है। सच है।
में वाकही गगन को चिरता चला जा रहा हूं
चिरता चला जा रहा हूं
जैसे मख्खन मे गरम छुरी।
आपल्या आयुष्यातील साऱ्या काही समस्या म्हणजे तो हवेचा प्रतिरोध. आणि जेंव्हा आपण आपल्या स्वतःच्या अनुभवातून शिकत, सर्व समस्यांवर मत करत, छान आठवणी सोबत घेऊन, मोठे होतो तेंव्हा आपल्या चेहऱ्यावरील समाधान म्हणजेच बाऊजींच्या चेहऱ्यावरील शेवटचं स्मित हास्य.
ए सपना नही
में उड रहा हूं...
में उड रहा हूं।
***
मदारी
निशिकांत कामत चा २०१६ मध्ये आलेला मदारी. भारतातील
राजकारण, भ्रष्टाचार, पैशांचा गैर व्यवहार या सर्व पारंपरिक विषयांवर भाष्य करतो. निर्मल(इरफान) हा इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आपला मुलगा(सर्वस्व) गमावून बसलेला हतबल मनुष्य, गृह मंत्र्याच्या मुलालाच किडनॅप करतो. आता कल्पना जरी चांगली असली तरी मध्ये मध्ये चित्रपट काहीसा संथ होतो किंवा नेहमीच्या मार्गावरून चालत राहतो. 
पण क्लायमॅक्स मध्ये निशिकांत कामत मधील दिग्दर्शक असा काही उफाळून येतो की चित्रपटातील सर्व चुका क्षम्य होतात. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात वेल क्राफ्टेड आणि हुशारीने बनवलेला क्लायमॅक्स असं याचं वर्णन करता येईल.
सर्व जनतेच्या समोर आपल्या चुकांबद्दल माफी मागायची अशी अट घालूनच निर्मल गृह मंत्री, त्यांच्या सहकार्यांना आणि अपघाताशी संबंधित बिल्डर यांना भेटायचे ठरवतो. तेंव्हा तो मुंबईमध्ये आल्याबरोबर निर्मल ला मारून टाकायचे आदेश सर्व पोलिसांना मिळतात. आणि होते देखील तसेच... निर्मल बस मधून गृह मंत्रांच्या मुलाला घेऊन खाली उतरतो आणि तेवढ्यात त्याच्यावर गोळीबार होतो. आणि हा संवाद ऐकू येतो...
बाझ चुजे पे झपटा... उठा ले गया।
कहानी सच्ची लगती है लेकीन अच्छी नही लगती।
 या भयानक वास्तवाला दिग्दर्शक आपला स्वतःचा युक्तिवाद जोडतो. आणि जे काही घडलं आहे ते सगळं मागे-मागे घेतो. आणि निर्मल थेट त्या मुलाला घेऊन स्वतःच्या घरी पोहोचतो. तिथे मग मीडियाच्या मदतीने या भ्रष्ट लोकांकडून या सर्व गोष्टी हुशारीने वदवून घेतो. आणि हे कल्पनेतील वास्तविकता खऱ्या आयुष्यामध्ये का नाही? असा प्रश्न प्रेक्षकांपुढे ठेवतो.
बाज पे पलटवार हुआ।
कहानी सच्ची नही लगती, लेकीन खुदा कसम बहुत अच्छी लगती है।
***
एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
नीरज पांडे या दिग्दर्शकाचा थ्रिलर, ड्रामा हा हातखंडाचं ! अ वेन्सडे, स्पेशल २६ आणि बेबी यातून ते सिद्ध झालेलंच आहे.
आता असा दिग्दर्शक बायोपिक दिग्दर्शित करणार आणि ते ही भारताच्या सर्वोत्तम क्रिकेट कर्णधारावर. सर्वांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा होती. आणि या अपेक्षांना हा चित्रपट सर्वार्थाने पात्र झाला असे म्हणता येणार नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध हा खरंच लख्ख सोन्यासारखा, झळाळणारा आहे. उत्तरार्धामध्ये मात्र प्रेमकथेमध्ये अडकणारा चित्रपट प्रेक्षकांचा काहीसा भ्रमनिरास करतो.
पण क्लायमॅक्स ला दिग्दर्शक चेंडू असा काही प्रेक्षकांच्या कोर्टमध्ये भिरकावतो... क्या बात !
महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द ऐनभरात असताना चित्रपटाचा शेवट कसा करणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न प्रेक्षकांच्या समोर होता. पण क्लायमॅक्स ला चित्रपट अगदीचं अफलातून खेळी करतो आणि प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलते. २०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटात '२०११ वर्ल्ड कप फायनल'च्या अविस्मरणीय आठवणी अशा काही जाग्या करतो की ती पडद्यावर पाहण्याची मजा औरंच! महेंद्रसिंग धोनी षटकार ठोकून प्रत्येक भारतीयाने उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करतो. आणि रवी शास्त्रीची ही कमेंट्री त्याला चोख साथ देते...
Absolutely magnificent, Dhoni finishes off in his style, A magnificent stroke into the crowd ! India lift the world cup after 28 years. And it's the Indian Captain who's been absolutely magnificent in the night of the final.
***

प्रस्तुत लेख ११ डिसेंम्बर २०१६ रोजी 'अक्षरनामा' या ऑनलाईन मराठी पोर्टल वर प्रदर्शित झाला होता.

Comments

Popular Posts