ट्रॅप्ड: एक जिवंत अनुभव !

फ से फॅण्टम !
फॅण्टम प्रोडक्शन हाऊस चे तीन हुकमी एक्के म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बेहल. या तिघांचा चित्रपट म्हणलं की नक्की काहीतरी वेगळं, चौकटी बाहेरचं पाहायला मिळणार, असा प्रेक्षकांचा विश्वास कायम ठेवण्यात या तिघांना कमालीचं यश आलं आहे. आणि हा विश्वास आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आलेला विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ट्रॅप्ड.


सुदैवाने कोल्हापूर मध्ये दुसऱ्या आठवड्यात का होईना पण ट्रॅप्ड प्रदर्शित झाला. रात्रीच्या खेळाला चित्रपट गृहात मोजून चार (मी, माझे काका-काकू आणि माझा लहान भाऊ) प्रेक्षक. ते सुद्धा तिकीट खिडकीवरच्या माणसाने तीन-तीन वेळा पोस्टर कडे बोट दर्शवत ''ह्यो पिक्चर आहे'' असं बजावून सुद्धा चित्रपट गृहात शिरलेले. असो...
बहुतांशी भारतीय चित्रपट रसिकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर असणारा 'उडान', 'द लास्ट लिफ'वर काहिसा आधारित, मोठ्या कॅनव्हास वर चित्रित केलेला 'लुटेरा' असे दोनच चित्रपट दिलेला एक प्रॉमिसिंग दिग्दर्शक ट्रॅप्ड नावाचा सरव्हायव्हल ड्रामा घेऊन येतोय आणि त्यात प्रमुख भूमिकेत 'राजकुमार राव' सारखा गुणी कलाकार आहे म्हणल्यावर भलतीच उत्सुकता होती.
शौर्य (राजकुमार राव) या पात्राभोवती फिरणारी ट्रॅप्ड ची अगदी छोटीशी आणि बंदिस्त कथा. गजबजलेल्या मुंबई शहरात 'स्वर्ग' नावाच्या मोठ्या इमारतीत ३५ व्या मजल्यावर भाड्याने राहायला घेतलेल्या फ्लॅटचं दार अचानक बंद होतं आणि शौर्य आत अडकतो. किल्ली बाहेर आहे, आत अन्न, पाणी, लाईट, मोबाईल अशा मूलभूत गरजांचा अभाव आहे. आणि त्या अगदी प्रेक्षकाला पटतील अशा दाखवल्या आहेत (ज्यांनी ट्रेलर वरून बरेच आक्षेप घेतले होते, त्यांचे नक्की समाधान होईल). आणि या साऱ्या बिकट परिस्थतीतून, सर्व अडचणींवर मात करून, शौर्य कसा बाहेर येतो हे दाखवणारा केवळ १०३ मिनिटांचा चित्रपट.


भारतीय प्रेक्षकाला हा चित्रपट, त्याची हाताळणी नक्कीच नवीन आहे. हॉलिवूड मध्ये कास्ट अवे, 127 आवर्स असे या पद्धतीचे चित्रपट येऊन गेले आहेत. पण या सर्वांपेक्षा ट्रॅप्ड उजवा ठरतो, ते या प्रमुख तीन कारणांमुळे...
पहिलं म्हणजे चित्रपटाची दोन प्रमुख कास्टिंग्स...
पहिलं कास्टिंग म्हणजे शौर्य च्या भूमिकेत राजकुमार रावचं. दीबाकर बॅनर्जी च्या LSD पासून आत्ताच्या अलिगढ पर्यंत त्याने कमाल विविधता राखून, प्रत्येक भूमिका तितक्याच सहजतेने साकारली आहे. शौर्य मध्ये होत जाणारे बदल, मग ते त्याच्या देह बोलीतील असोत अथवा आवाजातील, त्याने एकदम परफेक्ट आणि ठळक दाखवले आहेत. अगदी लहान लहान गोष्टींमध्ये खुश होणं, त्यांवर मात केल्यानंतरचा त्याचा आविर्भाव, सुरवातीला कोसळलेला आणि नंतर जिद्दीने पेटून उठलेला... सगळ्याचं ठिकाणी तो उजवा ठरतो. त्याची ती दयनीय अवस्था पाहून... 'अरे! थांब मी उघडतो दार' असा उद्गार मनातल्या मनात का होईना पण असह्य झालेल्या बहुतांशी प्रेक्षकांच्या मनात नक्की आला असणार, इतका अस्सल त्याने शौर्य साकारला आहे.
आणि दुसरं कास्टिंग म्हणजे मुंबई शहरातील स्वर्ग इमारतीतील फ्लॅट! 
कास्ट अवे, 127 आवर्स अशा चित्रपटात काय आहे तर, ती व्यक्ती निर्जन भूभागावर फसलेली आहे. पण इथे गजबजलेल्या ठिकाणी, सभोवताली हजारो लोकांची वस्ती असणाऱ्या ठिकाणी तो अडकलाय. आणि अशा परिस्थितीत, सभोवतली सर्व माणसे स्वच्छंदीपणे फिरत आहेत, स्वातंत्र्य अनुभवत आहेत आणि आपण मात्र इथे आत एका क्षुल्लक कारणासाठी अडकलोय, घुसमटतोय ! हे फिलिंग इमोट करताना दिग्दर्शकाला प्रचंड यश आलं आहे. सभोवताली मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुष्कळ लोक आहेत, पण कोणीच मदत करू शकत नाहीये हे अगदी रोजच्या जीवनातील वास्तवाचा अंडर करंट इथे खूप स्ट्रॉंग आहे.


दुसरं कारण म्हणजे सिनेमॅटोग्राफी. किमान ९५% चित्रपट एका फ्लॅट मध्ये चित्रित केलेला आहे. पण तरीही त्या क्षेत्रफळाची कमतरता कुठेही जाणवत नाही. क्लोज अप्स, सिंगल टेक शॉट्स, रिलीफ मोमेंट्स, फ्लॅट मध्ये लाईटचा अभाव असल्याने गडद छायाचित्रण या साऱ्यात प्रेक्षक प्रचंड गुंतून राहतो. शौर्य सोबत आपण सुद्धा त्या फ्लॅट मध्ये अडकलो आहोत की काय? इतकी उंच मजल सिनेमॅटोग्राफी मध्ये गाठली आहे.
आणि तिसरं कारण म्हणजे अफाट साउंड डिजाईन. घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजापासून फ्लॅटमधील सूक्ष्म गोष्टींपर्यंत सारंच प्रेक्षकाला त्या फ्लॅटमध्ये खेचत घेऊन जात 'एज सीट थ्रिलर'चा वेगळा अनुभव देतं. 
आणि या तिन्हीच्या जोरावर... लगोरीने कबुतराला मारण्याचा प्रसंग, अग्नीचा वापर करून लक्ष बेधून घेण्याचा प्रतातन आणि मदतीला आलेल्या स्त्रीचा पायऱ्या चढत वर येण्याचा प्रसंग एकदम हायलाईट होतात.


आता या चित्रपटांमधील अग्नीचा वापर करणे, उंदराशी संवाद (कास्ट अवे मध्ये फुटबॉलशी) आणि अजून काही प्रसंग 'कास्ट अवे'ची आठवण करून देणारे आहेत. पण माझा वैयक्तिक त्यावर आक्षेप नाहीये. हे सर्व प्रसंग मानवी स्वभावाचे कंगोरे दाखवणारे आहेत. आणि मग जर तुलना करायचीच असेल तर बाईंडर मध्ये सुद्धा लक्ष्मी मुंगळ्याशी बोलत असते, ते आपण कास्ट अवे मध्ये घेतलं आहे असं का म्हणत नाही ?
माझा मुद्दा एवढंच आहे की हे सारं मानवी स्वभाव चित्रण करताना ओघाने आलं आहे. चित्रपटातील नावं सुद्धा फार विक्षिप्त आहेत. आणि प्रचंड विरोधाभास निर्माण करणारी आहेत. शौर्य आणि स्वर्ग. अर्थात ते चित्रपट पाहतानाचं लक्षात येईल.
पण... हो आहेच इथेही. चित्रपटाचा किंबहुना राजकुमार चा प्रवास अगदी लिनीयर आहे. पास्ट-प्रेजेंट मध्ये जर तो खेळत राहिला असता तर त्याचा इम्पॅक्ट आणखी वाढला असता, असं राहून राहून वाटतं. चित्रपटाच्या सुरवातीला येणारी लव्ह स्टोरी सुद्धा फार सुपरफिशिअल वाटत राहते. शौर्य अडकल्यानंतर त्याचा पुढे फारसा संबंध येत नाही. त्यामुळे शौर्यच्या पात्राचा एक धागा असा अधान्तरी राहतो. शौर्य आत अडकल्यानंतर वरून काचा का टाकत नाही, मुंबई सारख्या ठिकाणी इतक्या कमी दरात कोणी कसे राहू शकते असे क्षुल्लक प्रश्न चित्रपट संपल्यावर डोक्यात एकदा का होईना पण येऊन जातात. 


पण या लिखाणातल्या कच्च्या दुव्यांवर वर नमूद केलेल्या बाबी सहज मात करून जातात. आणि त्यामुळेचं असा हा १०३ मिनिटे प्रेक्षाकाला खुर्चीला खिळवून अथवा ट्रॅप करून ठेवणारा 'भारतीय' (पुन्हा असा प्रयत्न होईल याची खात्री नाही) चित्रपट, चित्रपटगृहात जाऊनच प्रत्यक्ष गुरफटून जाण्यासारखा, अनुभवण्यासारखा आहे !

Comments

Popular Posts