कहानी २
बाऊंडस्क्रिप्ट एंटरटेनमेंट' हे नाव पडद्यावर दिसलं की पटकथेबद्दलची चिंताच संपून जाते. आणि त्यात जर लेखक म्हणून सुजोय घोष असेल, तर मग गोष्टीचं निराळी.
'कहानी' असं नाव जरी घेतलं तर प्रत्येकाच्या समोर उभी राहते ती वणवण फिरणारी प्रेग्नेंट बिद्या बागची आणि त्या कोलकता शहरातील विक्षिप्त दुनिया. २०१२ मध्ये येऊन गेलेला हा चित्रपट आज देखील प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतो. आणि त्याचा दुसरा भाग आज प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाचे प्रमोशन सुरु झाल्यावरचं हा कहानी चा सिक्वेल नाहीये, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या भागाचा या भागाशी काहीही संम्भध नाही. हा एक स्वतंत्र चित्रपट म्हणून आला आहे.
पहिल्या भागाचा प्रेक्षकांवरील प्रभाव अजूनही कायम आहे. त्यामुळे दुसरा भाग तयार केल्यावर त्याची तुलना पहिल्याशी होणार हे माहित असल्यामुळेच कदाचित सुजोय घोष ने जाणीवपूर्वक या भागाची मांडणी, पाहिल्या भागाची आठवणचं होणार नाही अशी काहीशी केली आहे. पण तरीसुद्धा पहिल्या कहानी मधील 'कि-इलेमेन्ट' यात आहेत. कोलकता शहर, काही बंगाली कलाकार, प्रमुख आणि सशक्त स्त्री व्यक्तिरेखा आणि अर्थातच कहानी चे 'हार्ट' विद्या बालन.
'कहानी: दुर्गा राणी सिंग' या नावाचे टायटल पडद्यावर झळकते आणि काहीतरी भन्नाट, रोमांचित करून टाकणारे पडद्यावर पाहायला मिळणार, या अपेक्षेने प्रेक्षकवर्ग सरसावून बसतो. आणि या सर्व अपेक्षांची पुरती लेखक-दिग्दर्शक सुजोय घोष आणि विद्या कशी करतो हेच पाहण्यासारखं.
चित्रपट सुरु होऊन एक ४-५ मिनिट झाल्यापासूनच तो प्रेक्षकांचा आणि त्यांच्या मनाचा असा काही ताबा घेतो, की आपण सर्वच जे काही नाट्य पडद्यावर सुरु आहे, ते पाहण्यामध्ये मग्न होऊन जातो.
एका मागून एक, एका मागून एक येणाऱ्या धक्यांमुळे प्रेक्षक पुरता खुश होऊन जातो. एकावर एक पडत जाणारे प्रश्न, खिळवून आणि 'प्रचंड'(माझ्यासाठी पहिल्यांदाच) तणाव तयार करणारी पटकथा, भन्नाट बॅकग्राउंड स्कोअर आणि पडद्यावर दिसणारी हतबल विद्या.
थ्रिलर चित्रपटासाठी आवश्यक असणारी चढत्या भाजणीची पटकथा, मती गुंतवून ठेवणारे प्रसंग, ट्विस्ट आणि टर्न्स मुळे बुचकळ्यात पडणारा प्रेक्षक आणि खास 'कहानी' चा इमोशनल टच यामुळे पूर्वार्धामध्ये सर्वच चोख आणि खणखणीत कामगिरी करतात. सादारीकरणामध्ये चित्रपटाचा पूर्वार्ध पहिल्या भागापेक्षा सुद्धा सरस ठरतो, हे नक्कीचं !
पण मग मध्यानंतर होते, आणि या गोष्टी 'काहीचं' काळापुरत्या का होईना पण बदलून जातात. चित्रपट थोडासा अपेक्षित वळणे घेऊन पुढे सरकतो. आणि जी थ्रिलर चित्रपटासाठी सर्वात वाईट बाब. पहिल्या कहानी मध्ये 'अर्णब बागची' आणि 'मिलन दामजी' यातील गुंता जसा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतो, तसं इथे दुर्दैवाने घडत नाही. 'दुर्गा राणी सिंग' आणि 'विद्या सिन्हा' या दोन व्यक्तिरेखांमधील गुंता काहीसा लवकर सुटतो. आणि मग पुढे चित्रपट केवळ थ्रिलर (पण काहीसा कमी थ्रिल देणारा) जॉनर मधील चित्रपट, अशा काहीशा अंगाने पुढे सरकतो. पूर्वार्धामध्ये असणारा प्रचंड तणाव सुद्धा काहीसा कमी होतो. आणि हेच काय ते चित्रपटाचं 'एकमेव' पण हो! मोठ्ठ अपयश. आणि याच अपयशाचा एक भाग म्हणून येतात, त्या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखा. कहानी मधील बॉब बिस्वास, सत्योकी, इन्स्पेक्टर खान या अथवा यांना पर्यायी अशा भूमिकांचा इथे अभाव आहे. सहाय्यक अभिनेत्यांमध्ये येणारे अर्जुन रामपाल, जुगल हंसराज, नाईशा खन्ना तरीसुद्धा चांगले काम करतात, हे विशेष. खास करून जुगल हंसराज ची काही प्रसंगात भिती वाटते.
पण मग शेवटाकडे येताना हा पुन्हा चांगली पकड घेतो आणि एक 'छान' चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांना देतो.
चित्रपटाचे चित्रीकरण हे कोलकाता आणि पश्चिम बंगाल च्या काही भागात झाले आहे. जेंव्हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट चित्रित केला जातो, तेंव्हा दिग्दर्शकला त्या प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यांची माहिती पाहिजे असे मानले जाते. आणि सुजोय ला त्याची पूर्णपणे माहिती आहे हे सारखे जाणवत राहते. प्रत्येक ठिकाणातील, त्याच्या भोवतालच्या परिसरातील, अंधाऱ्या खोल्यांमधील भीषण गडदपणा प्रत्येक प्रेक्षकाचा ठाव घेतो.
क्लिंटन सेरेजो याने बॅकग्राउंड स्कोअर आणि म्युजीक, कमालीचं आणि प्रचंड मेहनतीने तयार केलं आहे. त्या साऱ्यातील अस्सलपणा यामुळे अधिक ठळक होत राहतो. संकलनाच्या बाबतीत तर इथे उच्चान्क गाठला आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात, प्रसंगी घाबरवण्यात कमालीचं यश आलं आहे.
सुजोयच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर तो आणि त्याची पटकथा या चित्रपटाचा ब्रेन ! आणि त्यामुळेच तो चित्रपट 'तल्लख'पणे मांडतो. पटकथेतील खोली आणि तणाव पहिल्या भागापेक्षा अधिक जरूर आहे पण म्हणावा तितका परिणामकारक नाही. कहानी मध्ये क्लायमॅक्सला घडणारी जादू पुन्हा करण्याचा सुजोयचा प्रयत्न सुद्धा 'म्हणावा तितका' सफल होत नाही.
पण अशा काहीशा उणिवा, उत्तरार्धात उन्नीस-बिस होणारा चित्रपट या सर्वांवर मात करते ती म्हणजे 'विद्या'. तिच्या अभिनयाचे वर्णन करायचे झाले तर... पहिल्या कहानी तील विद्याचा अभिनय म्हणजे या चित्रपटाचा केवळ ट्रेलर आहे !
ती इमोशन, असह्यपणा, हतबलता आणि स्वतःचा असणारा भूतकाळ आपल्या व्यक्तिरेखेत कमालीचा साकारते. सर्वच प्रसंगांमध्ये ती कमालीची जान आणते. तिचा प्रेझेन्स नेहमीच सुखावणारा असतो, पण इथे 'दुर्गा राणी सिंग/विद्या सिन्हा' म्हणून असणारा प्रेझेन्स कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट म्हणली तरी वावगं ठरणार नाही. आणि हो...या वर्षी पुरस्कारांचा वर्षाव तिच्यावर झाला तरी आश्चर्य नक्कीच वाटणार नाही.
एकुणात काय, चित्रपट पाहिल्यावर सुजोय चे एका मुलाखातीमधील वाक्य आठवते...
कहानी २ मध्ये प्रेक्षकांना फ्लॉव सापडतील पण, विद्या फ्लॉवलेस असेल हे नक्की !
Comments
Post a Comment