वजनदार
सचिन कुंडलकर हे नाव पाहिलं रे पाहिलं की काहीतरी
'नवीन' पाहायला मिळणार, हे नक्कीचं असतं. गंध (मास्टरस्ट्रोक), रेस्टॉरंट, हैप्पी जर्नी, ऐय्या, राजवाडे अँड सन्स हे त्यांचे चित्रपट. या सर्वच चित्रपटांवर नजर टाकली तर एक गोष्ट अशी लक्षात येते, ती म्हणजे या सर्वात असलेलं एकमेव साम्य. पण ते साम्याचं आहे त्यातील 'विविधतेचं'. प्रत्येक चित्रपट वेगळ्याच विषयाला हात घालतो आणि मग स्वतःच्याच खास शैलीत दिग्दर्शक त्याची सहज अशी मांडणी करतो. गंध सारखी(!) कलाकृती त्यांच्याकडून परत काही पाहायला मिळाली नाही आणि त्याला 'वजनदार' सुद्धा दुर्दैवाने अपवाद नाही.अहो... अगदी साधा आणि सहज-सुंदर विषय आहे वजनदार मध्ये. कावेरी आणि पूजा या दोन मैत्रिणी. दोघांचा खाण्यावरचा ताबा काहीशा कारणांमुळे सुटल्याने त्या जाड होतात. मग त्यांच्या बाबतीत असं काहीसं घडतं की त्यांना आपलं वजन कमी करायलाच हवं असं जाणवतं आणि मग त्यांचा सगळा प्रवास चालू होतो.
हां... आता हा प्रवास इंटरेस्टिंग आहेच. त्यामध्ये मग मैत्रीतील छटा, लग्नानंतरचं बदलून गेलेलं आयुष्य, स्वतः बद्दलचाचं असणारा इन्फिरीअरीटी कॉम्प्लेक्स, एक फ्रेश लव्ह ट्रॅक, आजूबाजूचं वेगाने बदलत जाणारं टेक्नोफिलिक जग, टिपिकल(!) पुरुषी मानसिकता आणि मग त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या साऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी यामध्ये आहेत. स्वतःवर मनापासून प्रेम करणं किती महत्वाचं आहे, आपल्या बाह्यांगापेक्षा आपलं मन हे किती स्वच्छ आणि निर्मळ आहे हेच आपलं खरं सौंदर्य आहे, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो हे महत्त्वाचं.
वजनदार चा 'वजनदार' आधारस्तंभ म्हणजे सई ताम्हणकर आणि प्रिया बापट. काही रोलसाठी फिजिकल एफर्ट्स घेऊन त्या रोल मध्ये मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या परफेक्ट बसणं हे कलाकारांसाठी आणि त्याहून प्रेक्षकांसाठी जास्त महत्वाचं असतं. मराठीमध्ये असं फारसं घडत नाही (नटरंग आणि लोकमान्य याला अपवाद आहे म्हणा). पण यावेळी ते या दोघीनी अतिशय चोखरित्या केलं आहे. चित्रपट का पाहावा या प्रश्नासाठीचं, ह्या दोघींचा 'सुंदर' अभिनय असंच पहिलं उत्तर येईल हे नक्की.
आता चित्रपटाचं शूटिंगचं पाचगणी मध्ये झालं असल्याने ती वेगळीच मजा. चित्रपट पाहणे हाच एक सुखद आणि फ्रेश अनुभव होऊन जातो. आणि वजनदारचा जो 'टायटल ट्रॅक' आहे ना, तो एवढा मस्त आहे की तो सुरवातीलाच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो. त्यामुळे उशिरा जाऊन तो काही चुकवू नका. आणि या सुंदर सिनेमॅटोग्राफी ला अविनाश-विश्वजीत यांचं संगीत मस्तचं साथ देतं. संवाद सुद्धा छान खुसखुषीत आहेत.
आता यात सगळ्याच गोष्टी चांगल्या जमून आल्या आहेत, असं मात्र होत नाही. पटकथेमध्ये असणाऱ्या त्रुटींमुळे प्रेक्षकांना उत्तरार्धामध्ये थोडासा कंटाळा येऊ शकतो. मुळात कावेरी आणि पूजा या दोन भिन्न स्वभावाच्या मैत्रिणी कशा हा महत्वाचा प्रश्न सुद्धा अनुत्तरीतच राहतो. पाचगणी सारख्या लहान आणि टुरिजम स्पॉट असणाऱ्या गावात 'त्या' व्हिडीओची बातमी या दोघींच्या घरात कशी काय (केवळ इंटरनेट नाही म्हणून) पोहचत नाही, हे सुद्धा खटकतं. कावेरी आणि पूजाला त्या व्हिडीओ बद्दल जेंव्हा समजतं, ते जरा जास्तचं मजेशीर आणि इंटरेस्टिंग पद्धतीनं (पोश्टर बॉईज प्रमाणे) दाखवलं असतं तर ते अजूनचं मजा आली असती.
चित्रपटात दाखवलेल्या पुरुष व्यक्तिरेखा फारचं सुपरफिशियल लिहिल्या सारख्या वाटतात.
पण तरीही दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. विषय सर्वांच्याच घराघरातला असल्याने तो मस्त रिलेट सुद्धा होतो.
चित्रपटातील एका संवादाप्रमाणेच...
ज्या बारीक नसतात, त्या जाडच असतात.
पण असं चित्रपटांचं नसतं.
जे चित्रपट उत्कृष्ट नसतात, ते 'छान' असूचं शकतात !
-आशुतोष 😊
Comments
Post a Comment