व्हेंटिलेटर

हे नाव पाहिलं की... यावर सुद्धा चित्रपट येऊ शकतो का, असाच पहिला प्रश्न आपल्या मनात सहज डोकावून जातो. तसं म्हणलं तर हा विषय नावाप्रमाणेच गंभीर.
पण मग तो हाताळलाय कोणी तर राजेश म्हापुस्कर यांनी. आता हे कोण म्हणाल तर राजू हिरानीचे बऱ्याच वर्षांपासूनचे सहाय्यक दिग्दर्शक. प्रेक्षक हसत असताना एकदमचं त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येतील, अशी काहीशी जादू करणारा हा 'एकमेव' दिग्दर्शक. आता त्याच्या सहवासात इतकी वर्षे असल्यामुळे त्यांचे थोडेफार तरी गुण म्हापुस्करांच्यामध्ये उतरणार हे गृहीतच. आणि तीच सर्वात आनंददायी बाब. कारण असंच काहीसं सुखावणारं घडतंय व्हेंटिलेटर मध्ये.
'गजानन काका सिरीयस आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवलंय', अशा वाक्यापासूनच चित्रपटाची सुरुवात होते. आता हे वाक्य तसं गंभीर आहे, पण त्याला जी काही दिग्दर्शकाने 'मस्त' ट्रीटमेंट दिली आहे, तीच या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू. 
या चित्रपटामध्ये जी काही 'असंख्य' पात्रं (गजानन काकांना भेटायला येणारे नातेवाईक) रंगवण्यात आली आहेत, त्यांच्या तर्हेवाईकपणामुळे धम्माल विनोद निर्मिती होते. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मध्यंतरापर्यंत स्मित हास्य (जे बऱ्याच वेळेला laughter मध्ये सुद्धा बदलते) कायम ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. 
पात्रांच्या गर्दीमुळे आणि त्यांचे स्वभाव रंगवण्यामध्येच खूप काही वेळ गेल्यामुळे, दिग्दर्शकाला जे काही चित्रपटातून मांडायचंय, ते सारं तो मध्यंतरानंतर  मांडतो.
मध्यंतरापूर्वीच्या चित्रपटात सर्वच पात्रांची ओळख प्रेक्षकाला व्हायला हवी, या आग्रहामुळे चित्रपट तुकड्या-तुकड्यांमध्ये पुढे सरकत राहतो. आणि त्यातील एकसंधपणाचा अभाव काहीसा खटकत राहतो.
आंब्याच्या पेटीचा आणि गावाकडच्या संडासचा विषय हा काही जादूच्या नाण्यासारखा किंवा कोकणातील माणसं मुंबईला येताना होणाऱ्या प्रवासासारखा सहज जमला नाहीये, हे सुद्धा तितकंच खरं. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वार्धामध्ये कंटाळा येऊ शकतो पण तो उत्तरार्धामध्ये कात टाकून, उत्तुंग भरारी घेतो.
ती कात टाकताना सुद्धा तो प्रेक्षकांना अस्वस्थ करत नाही अथवा कोणता उपदेश ही करत नाही. प्रेक्षकांच्या कलानुसार तो त्यांना क्लायमॅक्स पर्यंत जसा काही घेऊन जातो ते केवळ अनुभवण्यासारखचं.
वडील-मुलाच्या नात्यातील जनरेशन गॅप, नात्यातील ताण-तणाव, डोळ्यात टचकन पाणी आणणारा आणि थेट काळजाला भिडणारा विषय असा काही उत्तरार्धामध्ये अलगदरित्या हाताळलाय ना...की तुम्ही त्याच्या प्रेमातचं पडता.
चित्रपटाचं कास्टिंग...
हा तर बोलायचा एक वेगळाच विषय आहे. परफेक्ट म्हणजे परफेक्टचं. स्वाती चिटणीस, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी, संजीव शहा, सुलभा आर्य, निलेश दिवेकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, मनमीत पेम, उषा नाडकर्णी... म्हणजे जे कोणी आहेत ते सगळेच. या सगळ्यांनी आपलं सर्वस्व यामध्ये ओतलं आहे आणि या चित्रपटाला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
सतीश आळेकर, जितेंद्र जोशी, आशुतोष गोवारीकर यांची नावं मुद्दामून वेगळी लिहिण्याचं कारण म्हणजे त्यांचा उत्तरार्धामधील वावर. त्यांची सहजता खरंच 'विलोभनीय' आहे. केवळ सतीश आळेकरांच्या अभिनयामुळेचं क्लायमॅक्स सिन अंगावर शहारा आणतो आणि चित्रपटाला एका अढळ स्थानी घेऊन जातो. जितेंद्र जोशीने भांबावलेला कार्यकर्ता आणि एक मुलगा ज्याप्रकारे साकारला आहे की तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरावा (अर्थात तुकाराम आणि भारतराव झेंडेसुद्धा आहेतचं) आशुतोष गोवारीकर ने साकारलेला 'राजा' पण खूपच छान. त्याने क्लायमॅक्स मध्ये वडिलांना बसमध्ये दिलेली 'ती'... वाह !
संगीताचं म्हणाल तर 'या रे या सारे या आणि बाबा' खूपच छान जमली आहेत आणि अतिशय योग्य जागी वापरली आहेत. संवाद सुद्धा 'साधे' पण चपखल आहेत.
दिग्दर्शकाचा वडील-मुलगा यांच्यातील नाते हा बहुतेक जिव्हाळ्याचा विषय असावा. फेरारी की सवारी मध्ये सुद्धा त्याने याच नात्याचे पदर उलगडले होते. चित्रपट पाहून झाल्यावर गहिवरून आलेला प्रत्येक मुलगा आपल्या वडिलांना कळवळून मिठी मारतो, हेच काय ते दिग्दर्शकाचं यश.
एकूणच काय तर व्हेंटिलेटर हा विनोदाची खमंग फोडणी असणारा, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि थेट भिडणारा, हृदयस्पर्शी अनुभव आहे.
- आशुतोष 😃

Comments

Popular Posts