रंगून: रंगून जाता जाता राहिलेला...
दुसरं महायुद्ध, जर्मनी-इंग्लंड संघर्ष, या महायुद्धात कचाट्यात सापडलेला भारत, भारतामध्ये पेटलेलं स्वातंत्र्य संग्राम, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, गुप्तहेर संघटना आणि या पार्श्वभूमी वर खुलणारी प्रेमकथा... कसलं भारी वाटतं ना ऐकायला ! आणि त्यात हि कथा 'विशाल भारद्वाज' नावाचा पट्टीचा स्टोरी टेलर घेऊन येतोय म्हणजे काहीतरी वेगळंच स्फुरण येतं.
म्हणजे तुम्हीच बघा... मकबूल, ओमकारा, हैदर, कमीने सारखे भारतीय चित्रपट सृष्टीला एक वेगळी ओळख देणारे, एक से एक सरस चित्रपट जो दिग्दर्शक... नाही, नाही... दिग्दर्शक, पटकथा-संवाद लेखक, संगीत दिग्दर्शक देऊन गेला त्याचा हा रंगून !
अगदी पहिल्या फ्रेम पासून प्रेक्षकाला गुंतवून ठेवणारा, आपल्या खास शैलीतून कथेची मांडणी करणारा, चित्रपटातील व्यक्तिरेखांना वेगळं अस्तित्व देणारा, गुलजारांच्या शब्दांवर संगीतरुपी कळस चढवणारा, चित्रपटरुपी 'स्लो पॉयजन' देऊन प्रेक्षकाला भुलवून टाकणारा विशाल भारद्वाज जसाच्या तसा इथे रंगून मध्ये आपल्या भेटीस आला आहे.
फक्त... !
सुरवातीपासून प्रेक्षकांचा घट्ट धरलेला हात, तो मध्येच कुठे तरी सोडून देतो.
कथा आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील बेधडक सुपरस्टार, जुलियाची(कंगना राणावत). तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला चित्रपट निर्माता रूसी बिलिमोरीया(सैफ अली खान) आणि जुलियाच्या संरक्षणाखातर नेमलेला इंग्रजी फौजेचा भारतीय रक्षक, नवाब मलिक(शाहिद कपूर). आणि यांच्यातील हा लव्ह ट्रँगल.
रंगून चा ग्राफ सुरवातीपासून उंचावत जाऊन मध्यंतरापर्यंत कमाल उंची गाठतो. नंतर तोच ग्राफ हळू हळू खाली सरकायला लागतो आणि क्लायमॅक्सला प्रचंड कहर करतो.
मध्यंतरानंतर फिल्मी झालेला आणि क्लायमॅक्स मध्ये जरा जास्तंच आणि हास्यास्पद ताणलेला रंगून, तरीसुद्धा चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी पुष्कळ कारणे देतो.
स्वातंत्र्यपूर्व काळ, दुसऱ्या महायुद्धाच्या दहशतीने व्यापलेला माहोल, अनप्रेडीक्टेबल युद्धजन्य परिस्थिती, डावपेच, तत्कालीन कला संस्कृती, वेशभूषा, संवाद या साऱ्यावर प्रचंड घेतलेली मेहनत आणि खोलात जाऊन केलेला अभ्यास आपल्याला त्या वातावरणाचा, परिस्थितीचा भाग बनवून जातो.
रंगून ची अजून एक हायलाईट म्हणजे पंकज कुमार यांची सिनेमॅटोग्राफी. वाह ! अरुणाचल प्रदेश, तेथील विलोभनीय निसर्गरम्य फ्रेम्स, जुलिया आणि नवाब मधील बहारणारा रोमान्स ते धुमसती, विद्रोही युद्धं हे सारं काही कॅमेऱ्यामध्ये कमाल टिपलं आहे. VFX मध्ये सुद्धा चांगला प्रयत्न झाला आहे (रेल्वेच्या धुराचा आणि क्लायमॅक्सचा अपवाद वगळता)
गुलजार साहेबांचे शब्द आणि विशाल भारद्वाजचं संगीत हा नेहमीच त्याच्या चित्रपटांचा प्लस पॉईंट ठरत आला आहे. चित्रपटाच्या पटकथेचा अविभाज्य घटक असणारी गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअर पटकथेमध्ये कमालीचं मिसळून गेलं आहे.
चित्रपटाचं कास्टिंग आणि व्यक्तीरेखांचं अनेक पदर असलेलं लिखाण हे विशालच्या चित्रपटाचं नेहमीच वैशिष्ट्य ठरत आलं आहे. अगदी 'मकडी'तील शबाना आझमींपासून आत्ताच्या हैदर मधील शाहिद, तब्बू पर्यंत एकही अपवाद नव्हता आणि रंगून सुद्धा नाही.
बेधडक सिनेस्टार जुलिया साकारताना कंगना अक्षरश: छा गयी है ! तिच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम भूमिका ठरावी.
नवाब साकारताना शाहिद कुठेही शाहिद वाटत नाही. हैदर पासून सुरु झालेल्या दिमाखदार प्रवासात नवाब हे आणखी एक नाव समाविष्ट झालेलं आहे. सैफचा रूसी सुद्धा लाजवाब आहे. त्याचं त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणं, क्रोध-प्रेम अशा एक्सट्रीम भावना त्याने लीलया पेलल्या आहेत. आणि या प्रत्येकाच्या वाटयला कमाल सिन्स आले आहेत. अर्थात या तिघांनी त्याचं सोनं केलं आहे हे वेगळ सांगायला नको.
इतर सहाय्यक भूमिकांमध्ये कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.
विशालचं दिग्दर्शन नेहमीचं उठावदार, त्याची स्वतःची ओळख पटवून देणारं असतं. पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये काही प्रसंगात त्याने केलेली कमाल कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे. उत्तरार्धामध्ये तो स्वतःच्या फॅन्टसी (टॅरँटीनोच्या इन्ग्लोरीयस बास्टर्ड्सशी साधर्म्य साधणारी) मध्येच जास्त गुरफटलेला राहतो आणि तिथेच चित्रपट मार खातो.
असा हा रंगून.
'रंगून' जाता जाता राहिलेला.
विशालची चित्रपटावरची पकड शेवट पर्यंत कायम राहिली असती तर त्याच्याचं मुकुटामध्ये आणखी एक मास्टर'पीस' रोवलं गेलं असतं, हे खरं !
Comments
Post a Comment