घनचक्कर: डार्क कॉफी
'द डर्टी पिक्चर' आणि 'कहानी' असे लागोपाठ सुपर हिट चित्रपट दिल्यानंतर, चहुबाजूनी पुरस्कारांचा वर्षाव झाल्यावर, 'मिसेस परफेक्शनिस्ट' या बिरुदाची मानकरी ठरलेली 'विद्या बालन' आता कोणता चित्रपट घेऊन येणार, दोन चित्रपटांमध्ये जुळून आलेली सगळी गणितं इथं सुद्धा तितक्याच यशस्वीपणे पुढे सरकणार का, सततच्या उजव्या कामगिरीमुळे तयार झालेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचं समाधान होईल असा चित्रपट येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली ती 'घनचक्कर' या चित्रपटाची घोषणा झाल्यावर. या थ्रिलर-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन 'राजकुमार गुप्ता' हा आमीर, नो वन किल्ड जेस्सीका असे गंभीर विषय यशस्वीपणे हाताळणारा दिग्दर्शक करणार म्हणल्यानंतर प्रचंड कुतूहल निर्माण झालं. द डर्टी पिक्चर मध्ये मस्त केमिस्ट्री जुळल्यानंतर 'इम्रान हाश्मी' पुन्हा विद्यासोबत काम करणार होता. त्याच्या लाल आणि पांढरे ठिपके असलेल्या ड्रेसच्या लुकमुळे बऱ्यापैकी (निदान त्याच्या चाहत्यांमध्ये) हवा झाली होती. आणि अशा साऱ्या पार्श्वभूमीवर २८ जून २०१३ रोजी घनचक्कर चित्रपटगृहात आला. चित्रपटाचे स्वागत बऱ्या वाईट समीक्षणांनी झालं. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. चित्रपटाचे उत्पन्न जेमतेम वसूल झाले. पण मी मात्र चित्रपट गृहात घनचक्कर पाहायला मोठया उत्सुकतेनं गेलो...
चित्रपटाची कथा फिरते 'मास्टर सेफ क्रॅकर' संजय अत्रे(इम्रान) भोवती. तो आणि त्याची अतरंगी, फॅशन ऑब्सेस्ड पंजाबी बायको नीतू अत्रे(विद्या बालन) एका लहान फ्लॅट मध्ये राहत आहेत. दोघांचं श्रीमंत होण्याचं स्वप्न आहे. पण नीतूला संजूचे गैरव्यवहार फारसे पसंत नाहीयेत. पण ती एक 'शेवटची' आणि मोठी चोरी करायची संजूला संधी देते. आता ही चोरी करण्यासाठी संजूला बोलावलेलं असतं ते दोन महाभागांनी ! पंडित(राजेश शर्मा) आणि इद्रिस(नमीत दास).
मग हे तिघे रात्रीचे जातात एक बँक लुटण्यासाठी. प्लॅनिंग बहुतेक शून्यच ! वेळेचं काहीतरी अतर्क गणित मात्र या दोन महाभागांनी मांडलेलं असतं. स्वतःचे चेहरे लपवण्यासाठी ह्यांनी अमिताभ बच्चन, उत्पल दत्त आणि धर्मेंद्र चे मुखवटे घातलेले आहेत. आणि मग ते ज्याप्रकारे बँक लुटतात ते केवळ पाहण्यासारखं आहे. (अशी 'ग्रेट' चोरी मी आत्तापर्यंत कधीचं, कोणत्याच चित्रपटात पाहिलेली नाहीये.) निव्वळ धम्माल !
आता तीन महिन्यानंतर...
संजूला पंडितचा पैशांसाठी फोन येतो. तर संजूला काही त्याची ओळख पटत नाहीये ! या तीन महिन्यांच्या कालावधीत संजूचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याचा स्मृतीभ्रंश झालेला आहेे. पण यावर काही पंडित आणि इद्रिस चा विश्वास नाहीये. आणि म्हणूनच हे दोघे संजूवर पाळत ठेवायला, संजूच्याचं घरी राहायला येतात.
आता संजुच्या घरात तो आणि त्याच्या बायकोरूपी असणाऱ्या नमुन्यांमध्ये आणखी दोन अस्सल, इरसाल चोरांची भर पडलेली आहे.
आता पुढं काय ?
असं काहीसं भन्नाट कथानक आहे. मग पुढं जे काही घडतं ते पाहण्याची मजा वेगळीचं आहे.
पुढच्या सर्व गोष्टी कथेच्या अनुषंगाने, पात्रांच्या तल्लख(!) बुद्धिमत्तेला न्याय देणाऱ्या प्रसंगातून घडत राहतात.
या चित्रपटातील प्रमुख पात्रांचं लिखाण असलं जाम भारी झालं आहे ना !
'संजू अत्रे' हा तसा कूल पण प्रचंड आळशी आहे. स्वतःच्या मस्तीमध्ये जगणारा, सारखा टीव्ही बघणारा, मोठ्या LED टीव्ही ची स्वप्नं बघणारा, बायकोच्या फॅशन सेन्सला, स्वयंपाकाला आणि आईच्या सतत येणाऱ्या कॉलला वैतागलेला. स्मृतिभ्रंश झाल्यामुळे आणि हे दोन चोर त्याच्या मानगुटीवर बसल्यामुळे तो काहीसा कंटाळला आहे.
अर्थात त्याचा कॉमिक सेन्स अशा परिस्थितीत देखील तल्लख आहे. नेमकं नको त्या ठिकाणी त्याला नको ते बोलायला त्याला परफेक्ट जमतं. आणि अधून मधून त्याला काहीही जुनं पुराणं आठवतं. पण त्या पैशाचं गणित काही त्याला सुटत नाहीये. अर्थात या सगळ्या छटा इम्रानने मस्त खुलवलेल्या आहेत.
नीतू अत्रे...!
ही अक्षरश: दमदार(!) व्यक्तिरेखा आहे. वेगवेगळी मॅगझीन वाचून तसले भलते सलते कपडे, इयर रिंग्स घालणारी, लाउड, टिपिकल 'पंजाबी वूमन' आहे. तिचा घरात राहायला आलेल्या महाभागांवर मात्र जबर वचक आहे. विद्याने नीतू साकारताना, 'ह्यां...' असं ठसक्यात म्हणताना धम्माल आणली आहे.
पंडित आणि इद्रिस ह्यांचे स्वभाव म्हणजे दोन समांतर रेषा. पंडित हा शांतपणे काम करणारा, सारासार विचार करून निर्णय घेणारा चोर आहे. तर इद्रिस नेमका त्याच्या उलटा. भडक माथ्याचा. छोट्या छोट्या गोष्टींवर त्याचा 'छोटा चेतन' बाहेर काढणारा, रात्री झोपायच्या आधी डॉक्टर- डॉक्टर खेळणारा, नितुकडे आगाऊ नजरेनं पाहणारा चोर. राजेश शर्मा यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या भूमिकेत जान ओतली आहे. आणि नमीत दास तर एकदम मोठ्ठं सरप्राईज पॅकेज आहे.
आता यातला विनोद म्हणजे 'ब्लॅक कॉमेडी'. हा... पण कोणताही बाष्कळपणा नसलेली. ओढून ताणून, अर्थहीन डायलॉग मारून हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न इथे एकही प्रसंगात झालेला नाही. अर्थात काही खमंग आणि आगाऊ संवाद आहेत. पण ते सुद्धा गंमत वाढवतातचं. संजूचा विसरभोळेपणा, इतर पात्रांचा तर्हेवाइकपणा आणि एकूण परिस्थिती यावर आधारित विनोद हा निखळ आनंद देणारा, पोट धरून हसवणारा आहे. बँक लुटण्याचा प्रसंग, नीतू-संजू यांचा डायनिंग टेबल वरील खुमासदार संवाद, इद्रिसच्या सांगण्यावरून संजूला एका बाबांकडे घेऊन जाण्याचा प्रसंग... असे अनेक प्रसंग माझ्यासाठी ऑल टाइम फेव्हरेट आहेत.
पण या सगळ्यात चित्रपट पैशाच्या गूढाचा धागा अजिबात सोडत नाही. ती टांगती तलवार संजू, नीतू आणि त्यात गुंतलेले आपण या सगळ्यांवर अगदी शेवट पर्यंत आहे. ती संशयाची सुई वारंवार एकमेकांकडे फिरण्याची, एखाद्यावर संशय बळावण्याची, शंकेचे खात्रीत रूपांतर होण्यासाठी पण पुन्हा प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडण्याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. आणि शेवटाकडे जाताना विश्वास, पारदर्शकता या संज्ञा धाब्यावर बसवून याची तीव्रता आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते. चित्रपटाचा हा क्लायमॅक्स आहे, आता काहीचं वेळात चित्रपट संपेल असे लक्षात येऊन सुद्धा चित्रपटाचा शेवट नेमका काय होईल, त्या पैशामागचं नेमकं सत्य काय असेल हे प्रेक्षकाला अजिबात म्हणजे अजिबात माहित नसतं, हे विशेष ! (माझ्या बेस्ट क्लायमॅक्सच्या यादीत याचं नाव यायला हवं होतं)
या चित्रपटाला असलेलं अमित त्रिवेदीचं संगीत, चटपटीत लिरिक्स, अल्ताफ राजाची थरकी गाणी, किंचित गडद सिनेमॅटोग्राफी हे सारं या खेळाची रंगत वाढवणारंचं आहे.
असा हा... 'त्या'वेळी समीक्षकांनी टीका केलेला आणि मला 'आज'ही भयानक आवडलेला घनचक्कर.
ही फिल्म माझ्यासाठी संथ गतीने त्याची नशा चढत जाणारी, डार्क फ्लेवर असणारी, माझी अत्यंत आवडती डार्क कॉफी आहे.
आणि ते विनोदी टायमिंग जर गवसलं तर तुमच्यासाठी सुद्धा ठरू शकते.
वाचत असलेल्या बहुतांशी लोकांनी 'घनचक्कर' पाहिला नसेल याची मला खात्री आहे. पण हे वाचून पाहावा अशी इच्छा झाली असावी !
Comments
Post a Comment