जग्गा जासुस: लॉजिकल/ मॅजिकल ?

तब्बल साडे तीन वर्षे काम सुरू असलेला जग्गा जासुस गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. काम सुरू असलेला म्हणण्यापेक्षा रखडलेला, टप्यांमध्ये चित्रित केलेला असं म्हणूया. भारतातील डिस्नि प्रोडक्शन चा शेवटचा चित्रपट, प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं पडद्यावर आणणारा दिग्दर्शक अनुराग बसू, रणबीर-अनुरागची जोडी असलेला आणि बऱ्याच पातळ्यांवर वेगळा ठरणारा बर्फी, जग्गा जासुस च्या ट्रेलर मधील वेगळेपणा आणि त्यातील म्युजिकल अंदाज हे सारं चित्रपटाकडे आकर्षित करणारं होतं.
पण चित्रपटाला मिळणारा विचित्र, दोन टोकं गाठणारा क्रिटिकल रिस्पॉन्स प्रचंड द्विधा मनस्थिती करणारा होता. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यात मला जास्त रस होता. आणि बहुतेक याच कारणामुळे काल थेटरात पाहायला गेलो...


श्रुती(कतरीना कैफ) एक कॉमिक सिरीज मधून तिच्या समोरच्या मुलाना किंबहुना आपल्याला जग्गाची (रणबीर कपूर) कथा सांगत आहे... 
तो स्वतः अनाथ आहे. एक दिवस त्याची टुटी फुटीशी (सस्वत चॅटर्जी) भेट होते. मग ते त्याचे फादर फिगर होतात. आणि एक दिवस त्याला सोडून निघून जातात. आणि त्यांना शोधण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या जग्गाची ही 'ऍडव्हेनचर स्टोरी'. ही सुरुवात आणि त्याचे प्रोसिडिंग जरी लहान वाटत असले तरी पुढे जाऊन कथानक दहशतवाद, आंतरराष्ट्रीय शस्त्र साठे, आतंकवादी संघटना अशा खूप मोठया विषयाला हात घालते. त्याची गरज होती का ? तर वैयक्तिक माझं मत, ‘नाही’. असो.
या चित्रपटाची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू खरंच चांगली आहे. यातील नायक वेगळा आहे, नायिकेला सुद्धा स्कोप आहे. आता तो नेहमीच असायला हवा हे जरी खरं असलं तरी आपल्याकडे दुर्मिळचं! चित्रीकरण खूप वेगवेगळ्या आणि निसर्गरम्य ठिकाणी झालं आहे. स्टोरी टेलिंग ची पद्धत वेगळी आहे. आणि सर्वात महत्वाचा असा म्युजिकल अप्रोच! आता या सर्व गोष्टींमुळे जग्गा जासुस वेगळा निश्चित ठरतो. पण वेगळा असणं आणि चांगला असणं यात फरक असतो. आणि हाच फरक जग्गा जासुस अधोरेखित करतो.


जग्गा जासुस चा सर्वात मोठा कॉन म्हणजे कथानक. म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे जग्गा टुटी फुटी ला शोधायला बाहेर पडतो हे खरं, पण पुढे काय ! हो मग त्याला नायिका भेटते. ओके. मग पुढे? असे प्रश्न उत्साह वाढवत नेतात म्हणून पडले तर त्यात मजा. पण इथे पुढे काहीचं कथानकाशी ठळक संबंध असणारं, प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं घडत नाही म्हणून हे प्रश्न वैतागलेल्या मनःस्थितीतून पडत राहतात. बहुतेक मध्यंतरापर्यंत. खुद्द चित्रपटामध्ये श्रुती स्वतः म्हणते ''बोअर हो रहे हो ना?'' तेंव्हा तिच्या समोरची मुले(मोठ्याना) आणि प्रेक्षक(मनातल्या मनात) "हो" असं म्हणतात. तेंव्हा श्रुती ''अब कुछ इंटरेस्टिंग करेंगे" असं म्हणती आणि मग कुठे चित्रपट पुन्हा मार्गावर येतो. कथानक थोडा फार वेग घेतं. पडद्यावर काहीतरी ठोस घडत आहे हे जाणवायला लागतं. आणि मग कुठे जीव भांड्यात पडतो. 
दुसरी त्रुटी म्हणजे एडिटिंग. खास करून ऍक्शन सिक्वेन्स मध्ये. बाहुबली: द बिगीनिंग मध्ये कसं एका लँडस्केप चा दुसऱ्याशी ताळमेळ लागत नाही. एक प्रसंगात झाडी असते. लगेच दुसरीकडे बर्फ ! तिथं ते खपून जातं. कारण ते सगळंच विश्व दिग्दर्शकाने उभं केलं आहे. पण इथं तसं नाही. इथं ऍक्शन सिक्वेन्स मधील दोन शॉट्स मध्ये खूप मोठा आणि जाणवणारा गॅप राहतो. आणि ते हास्यास्पद होऊन जातात. एकूण चित्रपटाचं एडिटिंग सुद्धा गोंधळात पाडणारं आहे. दिग्दर्शकाला स्थळ आणि काळ सांगण्याचं भान का नाही ? असं सुद्धा वाटत. नंतर त्याचा फारसा कथानकाशी संबंध नाही हे लक्षात आल्यामुळे नकळत दुर्लक्ष सुद्धा होतं.


रवी वर्मन यांची सिनेमॅटोग्राफी सुद्धा फार एक्सेप्शनल, ओव्ह..वॊव असे उद्गार निघावेत अशी नाही. बर्फी मधील काही फ्रेम कशा संस्मरणीय आहेत तशा इथे अजिबात नाहीत. म्हणजे पाहायला छान वाटतं इतकंच. त्यात सुद्धा आफ्रिका मध्ये शूटिंग झाल्यामुळे प्राण्यांचे काही अनावश्यक सीन्स आहेत. अर्थात त्या प्राण्यांचा वापर करून खूप काहीतरी मस्त करता आलं असतं. द रिव्हेनंट पासून राईज ऑफ एप्स पर्यंत खूप मोठी रेंज आपण पाहिलेली आहे. पण इथे कुठेच ती एक्साईटमेंट, मजा, थ्रिल वाटत नाही.
अभिनय मात्र सर्वांचाच छान झाला आहे. हो मला कतरिनाचं काम आवडलं. (कोणाला प्रॉब्लेम असेल, तर मनातल्या मनात निषेध करावा) रणबीर ची भूमिका बर्फी शी साधर्म्य साधणारी आहे. पण त्यातून सुद्धा एक वेगळी छटा कमाल पेश केली आहे त्याने. पण सगळ्यात ग्रेट म्हणजे सस्वत चॅटर्जी ! फार कमी सीन्स आहेत त्याना. पण कमालीचे रंगवले आहेत. चित्रपटाचे सुरुवातीचे काही क्षण केवळ त्यांच्यामुळेच एक वेगळ्या उंचीवर पोहोचतात. ते जग्गाचे खरे वडील नसून देखील त्यांच्यातील नातं आणि जग्गाची त्यांना शोधण्याची तळमळ अगदी त्यामुळेच जेन्युअन वाटते. आणि ‘तो’ इमोशनल कनेक्ट पुरता फसलेलं ट्युबलाईट सारखं उदाहरण समोर असल्यामुळे याचं महत्व जास्त जाणवतं.


आता वळूया म्युजिकल अप्रोच कडे. याचं जेंव्हा वर्णन 'म्युजिकल ऍडव्हेनचर' केलं होतं तेंव्हा कुतूहल होतं. आणि हा प्रयत्न बऱ्यापैकी जमून आला आहे. खरंतर म्युजिकल सिनेमा याचा साधारण अर्थ असा की म्युजिक च्या माध्यमातून चित्रपटाचे कथानक पुढं सरकणे. पण इथं हे नियमित होताना दिसत नाही. उलट काही गाण्यांचा अडथळा जाणवतो. अर्थात फिर वही, अफलातून आणि मुसाफिर चा अपवाद. पण तरीही संवादातील काव्य, त्याचा लिरीकल अस्पेक्ट हे खरंच कौतुक करण्यासारखं आणि सहज आहे. खास करून तुक्का आणि झूठ. (याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणून टीम बर्टन चा 'स्विनी टॉड' नक्की बघा) 
दिग्दर्शन आणि स्टोरी टेलिंग मध्ये सुद्धा बरेच वेगळे प्रयत्न आहेत. श्रुती जो संवाद मुलांशी साधती आहे तो आपल्याशी साधला आहे त्यामुळे आपण एका प्रकारे त्याचा भाग होऊन जातो. सिनेमाची एकूण ट्रीटमेंट कलरफुल, आनंद देणारी आहे. स्टेजवर परफॉर्म होणारे सांगीतिक नाट्य सुद्धा आपल्यासाठी नवीन आहे. व्हिज्युअल कॉमेडी चा बऱ्याच ठिकाणी चांगला वापर केलेला आहे. उदा. फोनच्या रिंगचा प्रसंग, टुटी फ्रुटी आणि श्रुतीचे बरेच समांतर प्रसंग.



टुटी फुटी जग्गाला सांगत असतो... 
आपल्याला दोन मेंदू असतात. डावा आणि उजवा. डावा मेंदू हा एकदम लॉजिकल आणि सरळ विचार करणारा असतो. उजवा मेंदू मात्र मॅड आणि मॅजिकल आहे ! आणि नेमका असाच अनुभव आहे जग्गाचा. मॅड आणि मॅजिकल असा उजवा मेंदू वापरला तर जग्गा त्याच्यातील असणाऱ्या मोठ्या चुकांसहित आवडू शकतो.


Comments

Post a Comment

Popular Posts