हॉररपट आणि मी

माझा सुट्टीचा ठरलेला कार्यक्रम असतो.
रात्री ११ वाजता लॅपटॉप घेऊन, नोकियाचे इयरफोन (त्याचा 'बास' जास्त असतो ना) कानात घालून, आवाज वाढवून, घट्ट पांघरूण घेऊन, जैयत तयारी करून एकट्याने (एकट्याने पाहायची गम्मत वेगळीच 😁) हॉरर चित्रपट पाहायला सुरवात करायची. सोबतीला एक कॉफीचा मग घ्यायचा. त्याचं काय आहे, भयपटातील भीती माझ्यासाठी थंडीमध्ये कधी बदलती हेच समजत नाही.
भीती वाटली की १-२ मिनिटं घट्ट डोळे मिटून बंद करायचे. भूत वगैरे काही नसतं असं मनाशी ठरवायचं. आणि पुन्हा नव्याने सुरवात करायची. तर्क, वैचारिकता असल्या सगळ्या गोष्टी वेशीवर टांगून तळघरात लपलेल्या भुताच्या मागावर निघायचं !
ह्या हॉरर चित्रपटातील सगळी पात्रे मात्र कमालीची धाडसी असतात बरका ! खास करून ती सगळ्यात लहान मुलगी. कुठं फार शूर वीर असल्यासारखी वावरत असते.
दबक्या पावलांचा आवाज आला, की लगेच उत्सुकतेपोटी तिकडे बघायला जातात. आणि गोची करून ठेवतात. तेंव्हा 'कशाला मरायला चाललंय तिकडं?' असं वाक्य हमखास आणि नकळत माझ्या मनात न राहता अगदी खास कोल्हापुरी ठसक्यात तोंडातून बाहेर येतं. अर्थात हा ठसका पुढच्याच क्षणी कुठे तरी भयभीत वातावरणात विरून जातो.
इतर वेळी नसतं धाडस दाखवणारा आणि भूत वगैरे सगळं काल्पनिक असतं, अशा फुशारक्या मारणारा मी तिकडे **** अजिबात गेलो नसतो, हे सुद्धा मनाशी नक्की करतो.
दारांचा कर्रर्रर्रर असा आवाज येणं, भली मोठी सावली दिसणं, टीव्ही नादुरुस्त होणं, अचानक वीज कडाडणं, फर्स्ट पर्सन मोड मध्ये कॅमेरा फिरणं, अचानक लाईट जाणं, काडेपेटीच्या प्रकाशात 'त्याचं' अस्तित्व ठळक होणं, सगळं जाम भारी(!) (आवेशात भारी म्हणून गेलो... मला जाम फाटणारं असतं, असं हो ! अगदी तसंच म्हणायचं होतं.) प्रत्येक वेळीचं भीती वाटते असं नाही, पण ते दचकण्याचं फिलिंग भारीचं असतं.
अगदी यातले इंटिमेट सिन सुद्धा काही वेळा सुकर वाटावेत, अशी तंतरली असते. गंभीर चित्रपटात जसे कॉमेडी सिन हजेरी लावतात ना तसंच काहीसं असतं इथे.
मग या चित्र-विचित्र घटना पाहून २ धाडसी पण स्टायलिश मांत्रिक (अहो मांत्रिकचं असतात ते) येतात. तेंव्हा कुठे माझ्या जीवात जीव येतो. त्यांच्या ठिकाणी मी स्वतःला पाहण्याचं नसतं धाडस करत नाही. कारण त्यांची पण वाट लागणार आहे, हे माहित असतं.
शेवट नेहमी सारखा पारंपरिक आणि क्रूर (भीतीचा इलेमेन्ट नसणारा) असणार हे माहित असून सुद्धा, त्या शेवटा पर्यंतचा प्रवास मला नेहमी आकर्षित करतो.
विशेष म्हणजे माझी भीती, माझ्यातील उत्सुकतेला ओव्हरकम करत नाही हे महत्त्वाचं ! भारतामध्ये काँज्यूरिंग १ या चित्रपटापासून हॉरर चित्रपटांची यादी सुरु होते आणि काँज्युरिंग २ ला येऊन थांबते.
पण माझं तसं नाहीये. अर्थात माझी सुरवात सुद्धा एक भारतीय असल्याने काँज्यूरिंग १ पासूनचं झाली. पण मी पुढे बरंच पाहिलं.
अगदी एक्झॉरसिस्ट, द शायनिंग, सायको(मला तरी पाहताना भीती वाटते) पासून हॅलोवेन, पोलटर्गइस्ट, द रिंग, स्क्रीम, द ब्लेअर विच प्रोजेक्ट ते आत्ताच्या ऍज अबाव सो बिलो, काँज्युरिंग, लाईट्स आउट, डोन्ट ब्रीद पर्यंत बरंच काही पाहिलंय.
अर्थात यातले काही वेगळी वाट अजमावणारे आहेत.
हिंदी मध्ये भूत, डरना मना है, भूल भुललैय्या(मी तरी घाबरलो होतो) आणि फोबिया सोडून तसा दुष्काळ आहे.
पण ही हॉरर पटांची संकल्पनाचं मला फार आवडते.
म्हणजे बघा कि... दुसऱ्याला घाबरवायचं 😉
पण अशी मजा रात्रीचे सर्व मित्र जमले असताना, एक एक कोकणातील भयकथा वारेमाप मसाला टाकून सांगायला सुरुवात करतो ना तेंव्हा सुद्धा येते.
नारायण धारपांच्या लिखाणाबद्दल ऐकून आहे. चित्रपटात एकदा भूत डोळ्यासमोर दिसलं कि त्याची तीव्रता कमी होते. पण इथे आपल्या कल्पनेतील भूत सारखं सारखं भयानक होतं म्हणे.
माझा वाचनाचा आधीच उजेड(चित्रपटाचं आणि अभ्यासाचं सगळं वाचतो म्हणा) असल्यामुळे राहून गेलंय ते. पण ते सुद्धा नक्की ट्राय करेन.
तुम्ही मात्र असा अनुभव नक्की घ्या.
आणि जर घेतला असेल तर हा आनंद वेगळाच नाही का ?
***
तुमचा अनुभव पण नक्की सांगा.

Comments

Popular Posts