रईस: जान नसलेला जाम !

आ रहा हूं... असं म्हणत म्हणत काही दिवसांपूर्वी रईस चा ट्रेलर आला. शाहरुख ची दुसरी इनिंग सुरु झाली आहे, राहुल ढोलकिया सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आहे आणि नवाज सारखा कसलेला अभिनेता सुद्धा आहे त्यामुळे एकूणच उत्कंठा शिगेला पोहोचली होतीचं. आणि आता २६ जानेवारीच्या मुहूर्तावर शाहरुखचा 'द मोस्ट अवेटेड' चित्रपट रईस प्रदर्शित झाला आहे.






हिंदी चित्रपट खरंच बदलत आहे. वेगवेगळे प्रवाह येथे मिसळत आहेत. आर्ट सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा, क्लास-मास प्रेक्षकवर्ग यातील दरी सुद्धा कमी झाली आहे. दंगल, ऐअरलिफ्ट, तनु वेड्स मनू, नीरजा, उडता पंजाब, पिंक सारख्या अतिशय भिन्न असणाऱ्या आणि वेगळी वाट निवडणाऱ्या चित्रपटांवर प्रेक्षक वर्ग भरभरून प्रेम करत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते प्रेम तिकीट बारीवर सुद्धा दिसत आहे. आणि याचा उच्चांक म्हणून खुद्द सलमान खान सुद्धा बजरंगी भाईजान सारखे सेन्सिबल चित्रपट घेऊन येत आहे. पण मग या सगळ्यात शाहरुखचं मागे का ?








आता त्याला कारणे सुद्धा आहेत म्हणा. म्हणजे स्वदेस सारखा सुंदर चित्रपट फारसा चालला नाही, पहेली सारखा हटके फॅन्टसी असलेल्या चित्रपटाकडे सुद्धा प्रेक्षकांनी पाठ फिरवली, फॅन मध्ये केलेला प्रयत्न सुद्धा पुरता फसला आणि नुकताच आलेला डियर जिंदगी तर खुद्द त्याच्या चाहत्यावर्गानेच नाकारला.
त्यामुळे पुन्हा शाहरुख नेहमीच्या वाटेवर परतला आहे.
आता चित्रपटाचं म्हणाल तर हा तद्दन धंदेवाईक, मसाला चित्रपट आहे. आणि तो तसा असण्यावर माझा काहीच आक्षेप नाही. पण त्यातला मसाला जर जीव ओतून टाकला असेल तर त्याची मजा घेता येईल ना !
'ओल्ड वाईन इन न्यू ग्लास' म्हणावं तरी सुद्धा पंचाईत. म्हणजे तो ग्लास, केवळ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे म्हणून नवीन म्हणावा का ?
चित्रपटाची पटकथा तशी बेताची आहे. गुजरात सारख्या दारूबंदी असलेल्या राज्यात रईस(शाहरुख खान) हा महत्वाकांक्षी तरुण स्वतःचा विदेशी दारूचा व्यापार सुरु करतो. मग त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, डावपेच, विरोधी व्यापारी, राजकारण, आणि त्याच्या मागावर असलेला पोलीस अधिकारी जयदीप मजमुदार(नवाजुद्दीन सिद्दीकी) अशा भरपूर गोष्टी इथे अपेक्षेप्रमाणे येत राहतात. बऱ्याच ठिकाणी अगदी अलीकडेच सुरु झालेल्या 'नार्कोस' या नेटफ्लिक्स वरील मालिकेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अस्सलतेचा अभाव सुद्धा आहेचं.
आपल्याला टॉम अँड जेरी आठवतंय ? तसाच इथे उंदीर- मांजराचा (चोर-पोलिसांचा) खेळ आहे. म्हणजे त्यात डाव-पेच हे आलेच. पण टॉम अँड जेरी पाहताना जसं आपण धम्माल हसतो ना तसेच रईस पाहताना सुद्धा एक-दोन वेळेस अतार्किक गोष्टींमुळे (मनापासून) हसू येतं. आणि याचं फार वाईट वाटतं.
चित्रपट सुरु होतो तो रईस च्या बालपणापासून. सुरवातीचा एक प्रसंग छान जमला असल्यामुळे आणि घटनांचा वेग जास्त असल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. पण पुढे चित्रपट धन्यवादचं. पटकथेतचं फारसा दम नसल्यामुळे आणि विनाकारण मध्ये मध्ये येणाऱ्या तब्बल अर्धा डझन गाण्यांमुळे प्रेक्षक थकून जातो.
चित्रपट ऍक्शन- थ्रिलर जॉनर चा असल्यामुळे ऍक्शन मध्ये दम असायला हवा होता. तो आहे सुद्धा. पण काही काही सिन व्हिडीओ गेम मध्ये असल्यासारखे जाणवतात. म्हणजे भिंतीवर कशाचा आधार न घेता चढणं, इमारतीवरून चालत्या ट्रक मध्ये उडी मारणे आणि तेवढाच नव्हे तर त्याच बरोबर एक लाथ सुद्धा...वगैरे वगैरे.
८०-९० च्या दशकात उभारलेली ही कथा जरी सामान्य आणि काहीशी प्रेमकथेत भरकटणारी असली तरी तो काळ, माहोल उभा करण्यात दिग्दर्शकाला पुरतं यश आलंय. आणि या यशात के. यू. मोहानन च्या सिनेमॅटोग्राफीचा आणि रॅम संपथ च्या बॅकग्राउंड स्कोअर चा वाटा महत्वाचा आहे. खास करून ती रईस ची ट्युन मजा आणते.
या चित्रपटाचे मियाँभाई की डेरिंग, थाने की चाय, शेरोंका जमाना...असे संवाद मात्र चमकदार आहेत. शाहरुख आणि नवाज जेंव्हा आमने सामने येतात तेंव्हा तर ते जास्त खुलतात हे विशेष सांगायला नको. शिट्टीचा प्रसंग, नवाजची एंट्री, रोडरोलर चा प्रसंग, कॅरम खेळतानाचा प्रसंग, प्री क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स असे काही प्रसंग खरंच चांगले जमले आहेत.

अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर...
शाहरुख खान रईस च्या भूमिकेत चांगला वाटतोय. म्हणजे त्याचा एकूणच अंदाज, पेहराव(चष्मा, डोळ्यात काजळ) वगैरे छान आहे. पण व्यक्तिरेखेचा आलेख जरी चढता-उतरत असला तरी तो प्रेक्षकांपर्यंत म्हणावा तितका पोहचत नाही. अर्थात शाहरुख त्याचं काम चोख करतो पण लिखाणातील उणीव जाणवत राहतेच. म्हणजे नक्की याला चित्रपटाचा हिरो करायचं, व्हिलन का अँटी हिरो हे समजलं नसावं असं वाटत राहतं. वन्स अपॉन.. मधील सुलतान मिर्झा सुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्यात डोकावत राहतो.
नवाजुद्दीन सुद्धा शाहरुख च्या समोर उभा असल्यामुळे  त्यांच्यातील जुगलबंदी मस्त रंगणार अशी अपेक्षा होती. ती काही अंशी खरी ठरते. पण त्याहून त्यांचे वैयक्तिक प्रसंग जास्त चांगले वाटतात हे सुद्धा तितकाच खरं. नवाजला यात म्हणावा तेवढा वाव नाहीये याची खंत मनात राहते. तरी सुद्धा तो आपल्या वाट्याला आलेले प्रसंग, संवाद आणि व्हॉइस ओव्हर नरेशन मस्त रंगवतो. काही प्रसंगात शाहरुख पेक्षा वरचढ सुद्धा ठरतो म्हणा.

आता माहिरा खान या (पाकिस्तानी) अभिनेत्रीला का घेतलं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणं साहजिक आहे. म्हणजे अभिनयाची बाराखडीचं येत नसलेली अभिनेत्री घ्यायची होती तर त्याची आपल्या इथं कुठे कमी होती. मोहम्मद अय्युब मात्र हमखास लक्षात राहतो. शाहरुखच्या समोर त्याचं रिऍक्ट होणं नक्की भावतं. त्या दोघांच्या लहानपणीचे प्रसंग सुद्धा पुढे चांगले येतात. अतुल कुलकर्णी यांना थोडा तरी अभिनयास थोडा तरी वाव आहे पण उदय टिकेकर यांना तेवढाही नाही.
त्यामुळे अपेक्षा जर घेऊन गेलात तर पदरात काहीच पडणार नाही हे लक्षात आलं असेलच. स्टारडम च्या कोशात अडकलेल्या शाहरूखचा पूर्वपार चालत आलेला चित्रपट पाहायला जातोय, या विधानाशी जर तुम्ही स्वतः प्रामाणिक असाल तर फारतर म्हणजे अगदी फारतर एकदा बघायला हरकत नाही.

Comments

Popular Posts