डम्पलिंग्ज
'३ एक्सट्रीम्स' हा आशिया खंडातील आघाडीच्या दिग्दर्शकांनी एकत्र येऊन २००२ मध्ये उभा केलेला हा प्रकल्प. अर्थात यात भारतीय दिग्दर्शकाचा समावेश नाहीये.
भारतामध्ये तसा बॉम्बे टॉकीज हा चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन बनवलेला चित्रपट. याचं साधारण रूप कसं होतं, तर यामध्ये ४ विविध कथा होत्या. त्या दिग्दर्शकांनी आपापल्या शैलीत मांडल्या. आता हे एकमेव साम्य लक्षात घेता, बॉम्बे टॉकीज आणि डम्पलिंग्ज मध्ये काहीही साम्य नाही.
यामध्ये ३ वेगवेगळ्या कथा आहेत.
हे कोलाज 'कट, बॉक्स आणि डम्पलिंग्ज' या तीन शॉर्ट्स(लघुपट)नी बनलेलं. नावं जितकी विचित्र आणि अतार्किक आहेत, तसेच अथवा किंबहुना त्याहून ही जास्त या शॉर्ट्स!
पाहायला सुरुवात केली आणि पहिलीच होती ती फ्रुट चॅन ची डम्पलिंग्ज. आता डम्पलिंग्ज हा खाद्य पदार्थ. आणि याविषयावर शॉर्ट येणं, त्यात सुद्धा ती हॉरर या प्रकारात मोडणारी असणं म्हणजे नवलचं.
हॉररपट म्हणलं की अमानवी शक्तींचा हस्तक्षेप, विशिष्ट आणि सवयीचं प्रकाश संयोजन आणि साचेबद्ध पटकथा हे गृहीत असतं. आणि जेंव्हा आपले हे सगळे ठोकताळे चुकवून काहीतरी भलतंच जेंव्हा पाहायला मिळतं, ती मजा काही औरंच !
सायको, द शायनिंग, शटर आयलँड मध्ये निर्माण होणारे भय या सर्वचं चौकटीत न बसणारे होते. पण मग आपण ती भीती कोणत्या ना कोणत्या शब्दात व्यक्त करु शकत होतो. सायको मधील काही थोडक्याचं प्रसंगांमध्ये हिचकॉक ने कॅमेरा तंत्र आणि संगीतामध्ये केलेला अभिनव प्रयोग, द शायनिंग मध्ये जॅक टॉरेन्स या पात्राबद्दल असणारे कुतूहल अथवा शटर आयलँड मध्ये खुबीने उभे केलेलं आभासी(!) चित्र, असं काहीसं आपण या चित्रपटातील हॉरर कंटेंट बद्दल भाष्य करू शकतो.
पण डम्पलिंग्ज याला सुद्धा अपवाद ठरतो. यातील भयोमर्यादा आपल्या मर्यादेपलीकडची आहे. अशा एखाद्या विशिष्ट घटनेमुळे भीती वाटते, या प्रसंगांमध्ये एकदम दचकायला होतं, अशी कोणतीही चाकोरीतील संकल्पना इथे लागू होत नाही.
मानवी व्यक्तीरेखांमधील अमानवी प्रवृत्तीचा बेमालूम हस्तक्षेप, वैशिष्ट्यपूर्ण संगीत, घटनेमधील 'तीव्र'ता ठळक करणारं प्रकाशसंयोजन, अंगावर काटा येणारी(मी शहारा म्हणत नाहीये), डोळे घट्ट मिटून शांत बसावं अशी असंख्य दृश्यं, आणि सहन न होणारी, अतिशय सहज सोपी मांडणी, असं बरंच काही सांगता न येण्यासारखं डम्पलिंग्ज मध्ये अनुभवायला मिळतं.
किल-बिल पासून रमन राघव २.० च्या सगळ्याचं क्रूरतेच्या, भीषण गडदतेच्या व्याख्या डम्पलिंग्ज कुठेतरी विस्तारु पाहतोय कि काय? असं सारखं वाटत राहतं.
काही ठिकाणी मनात भलत्यासलत्या शंका सुद्धा मनात येतात. आणि परत आपण इतका वाईट विचार कसा करू शकतो म्हणून लाज ही वाटू शकते. पण त्या साऱ्या शंका खऱ्या असाव्यात असं सुद्धा वाटत राहतं.
विचारांची समृद्धी हेच खरं सौंदर्य, आपली शुद्ध मानसिकता नेहमीच आपल्या आचाराविचारात डोकावू पाहते, आपल्या पारदर्शी आचरणामुळे जीवनातील गोष्टी सुकर होऊन जातात, या सगळ्या आदर्शवादाच्या पुतळ्याला डम्पलिंग्ज
मुळे नग्नता प्राप्त होते आणि आपल्या आजूबाजूचं वास्तव पाहताना मनाच्या खोल तळाशी आपण कुठेतरी हेलावून गेलो आहोत, असा काहीसं अवघडलेलं फिलिंग मनात रुतून बसतं.
एखाद्या सवयीच्या आहारी जाऊन मनुष्य प्राण्याचं(!) होणारं अध:पतन ही इथली संकल्पना. हा विषय हाताळताना दिग्दर्शक आत-बाहेर काहीचं ठेवत नाही. इथे कोणताही प्रसंग वरवरचा अथवा आभासी नाही. जे काही त्याला वाटतं ते तो जगाची फिकीर न करता दाखवतो. अर्थात त्याला एक दिग्दर्शक म्हणून मिळणार स्वातंत्र्य हे कौतुकास्पद आहे.
केवळ ४० मिनिटांच्या या लघुपटातील २ प्रमुख पात्रं आणि कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या ३-४ व्यक्तिरेखा कायम स्वरूपी लक्षात राहणाऱ्या आहेत, हे सुद्धा तितकंच खरं.
लघुपटाची पटकथा मी इथं अजिबात लिहिणार नाही. ती तुमचा डम्पलिंग्ज पाहतानाचा इंटरेस्ट हिरावून घेईल, असं मला वाटतंय.
हे वाचून...एक अस्सल अनुभव येईल असं तुम्हाला जे वाटतंय त्या आणि मी वाढवून ठेवलेल्या अपेक्षांना डम्पलिंग्ज नक्की पात्र ठरेल, याची हमी मी देतो.
कमकुवत मनोधैर्याचे असाल तर तुम्ही याच्या वाट्याला जाऊ नका, असलं काहीही मी सांगणार नाही. नक्की बघा. एक न अनुभवलेला अनुभव आणि अव्वल दर्जाची शॉर्ट म्हणून याच्या वाट्याला जरूर जा एवढंच सांगेन.
बाकी माझे सुद्धा पुढच्या २ शॉर्ट पाहायचे धाडस झालेलं नाहीये. पण या शॉर्टला धरूनचं २००४ मध्ये प्रदर्शित झालेला डम्पलिंग्ज नावाचा स्वतंत्र चित्रपट पाहायचा हे नक्की ठरवलं आहे.
*****
लिंक-
https://youtu.be/ocHvQaA4gqk
*****
Comments
Post a Comment