मुरांबा: नितांत सुंदर !

'आमचं वेगळं आहे' अशी टॅग लाईन वापरून प्रेक्षकाला सुरवातीलाच चित्रपटापासून वेगळं करण्यापेक्षा 'तुमच्या घरातील आमची गोष्ट' ही मुरांबा ची टॅग लाईनचं मुळात आपुलकीची भावना निर्माण करणारी आहे.


बरेच दिवस मुरांबा पाहायचं ठरवलं होतं, आज तो योग आला. चालू असलेल्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा थिएटर छान भरलेलं होतं हे पाहूनच मनाला बरं वाटलं. आपापली सीट बघून व्यवस्थित बसलो आणि चित्रपट सुरू झाला. 
चित्रपटाचा ट्रेलर पाहून रॉम कॉमच्या पारंपारिक चौकटीत न बसणारं काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली होती. आणि अगदी पहिल्या फ्रेम पासूनचं पारंपारिक चौकटी मोडत आणि आपली जाणीव खरी ठरवत चित्रपट पुढे सरकायला सुरुवात होते. टिपिकल रॉम कॉम नेमका फसतो कुठे तर चावून चोथा झालेल्या अथवा काहीशा वेगळ्या अंगाने जाणाऱ्या लव्ह ट्रॅक, बडिंग रोमान्स मध्ये. पण इथे सुरुवातचं ब्रेक अप पासून होते ! आता ब्रेक अप झाल्यावर मुलगा आणि मुलगी यांचं रुटीन लाईफ पण इथे होत नाही. मग होतं काय !


ही गोष्ट आहे आलोक(अमेय वाघ) ची. तो आणि इंदू(मिथिला पालकर) ४ वर्षे रिलेशनशिप मध्ये आहेत. आणि त्यांचा आता ब्रेकअप झालाय. ब्रेकअप झाल्याचं आलोक आपल्या आई वडीलांना (चिन्मयी सुमीत आणि सचिन खेडेकर) दुसऱ्याच दिवशी सांगतो. आणि या साऱ्या प्रकारात हे दोघे लक्ष घालतात. आलोक व त्याच्या आई वडिलांच्या पर्सपेक्टिव्ह मध्ये जरी चित्रपट घडत असला तरी यात महत्वाचं म्हणजे इंदूची मते, तिचा पर्सपेक्टिव्ह सुद्धा इथे विचारात घेतला जातो.
मुलाशी स्थगिती प्राप्त झालेला, अगदी आपल्या जवळचा वाटणारा संवाद, जनरेशन गॅप, आई वडिलांची प्रेमळ मानसिकता, त्यांची स्वतःला या बदललेल्या कल्चरमध्ये सामावून घेण्याची धडपड, आलोक आणि इंदू यांची मानसिकता, त्यांची एकमेकांबद्दलची मतं, अपेक्षा हे सारंच छान आणि तरल पद्धतीने दिग्दर्शक असं काही पडद्यावर मांडतो की ते पाहताना एक वेगळाचं आनंद वाटतो.
चित्रपट दिग्दर्शित केला आहे वरूण नार्वेकर यांनी. त्यांनी आधी 'कासव' साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. चित्रपट हे दृश्यमाध्यम आहे हे पटवून देणारा आणि इतर सर्वच बाबींवर कमांड असणारा दिग्दर्शक इंडस्ट्री आणि प्रेक्षकाला मुरांबा कडून मिळाला आहे. आणि आता असं चोख आणि समृद्ध काम केल्यानंतर अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत.
आई वडील आणि आलोक यांच्या नात्यातील प्रत्येक कंगोऱ्याचा, नात्यांतील पदर, छटा यांचा झालेला संपूर्ण अभ्यास लिखाणामध्ये जाणवतो. मेलोड्रामा, अवास्तव भावनिक हेवेदावे या साऱ्याला बगल दिल्यामुळे चित्रपट अतिशय साधा आणि सुसह्य होतो. तेच संवादांबाबतीत. अतिशय नेमके, आपल्या रोजच्या वापरातले, चपखल संवाद आणि तितकंच कलाकारांचं ते सादर करण्याचं टायमिंग. हे समीकरण मस्त जुळून येतं. 


बॅकग्राउंड स्कोअर हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे मुरांबाचा. म्हणजे वर्षोनुवर्षे ऐकत आलेली इन्स्ट्रुमेंट्स, त्यांच्या ठरलेल्या ट्युन्स इथे अजिबात नाही. ड्रमसेट, सिंथेसायझर यांच्या बिट्स वर संपूर्ण चित्रपट कॅरी होतो. प्रसंगानुसार त्यांची तीव्रता आणि सौम्यता यांचा सुरेख मिलाफ झाल्याने 'बर्डमॅन'ची हमखास आठवण येते. गाणी सुद्धा दोनच आहेत. पण अगदी गुणगुणत रहावीत अशीच आहेत. चित्रपटाच्या संकलनाचा सुद्धा पास्ट-प्रेझेंट मध्ये प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात मोठा वाटा आहे. 
सिनेमॅटोग्राफी... वाह ! भारतात बहुतेक पहिल्यांदाच इतकी रिच ट्रीटमेंट चित्रपटाला देताना मी पाहिलं आहे. आलोकचं घर, तेथील सर्वच रंगसंगती, गाडीतून होणारा प्रवास, हॉटेल मधील संभाषण सगळं असं वेगळ्याच रिच टोन चित्रित केलं आहे. आणि या साऱ्याचा उत्कर्षबिंदू म्हणजे आलोक आणि बाबांच्यामधील, त्यांच्याच रूम मधील संवाद ! आलोकच्या बाबांना चित्रपटाची आवड असते त्यामुळे त्यांच्या रूममध्ये चित्रपटांच्या फोटो फ्रेम्स असणं साहजिक आहे. पण त्याचा इथे कमाल वापर झालेला दिसतो. म्हणजे जेंव्हा आलोक खोलीत येतो तेंव्हा तो प्रचंड गोंधळलेला, घालमेल होणार, स्वतःशीच संघर्ष करणारा असतो. त्याला प्रतिकात्मक भिंतीवर रेजिंग बुल मधील गोंधळलेल्या जेकचा फोटो असतो. त्याच वेळी समजूत घालणाऱ्या बाबांच्या मागे वॉल्ट डिस्ने चा फोटो असतो. बाबा समजावून सांगत असताना आलोक च्या मागे बॉब निरोचा शांत विचार करत बसलेला एक फोटो दिसतो. दोघांच्या मधील संवाद झाल्यावर त्या दोघांच्या मागे आर. डी. आणि एस. डी. बर्मन यांचा सुरेख फोटो असतो. अजूनही काही प्रसंग असेच मस्त झाले आहेत. असा मेटाफरचा खोल आणि प्रतिकात्मक वापर कौन(राम गोपाल वर्मा), हायवे(उमेश कुलकर्णी) अशा अत्यल्प चित्रपटांमध्ये मला जाणवला आहे.



अभिनयाच्या बाबतीत जितकं बोलावं तितकं कमी आहे. सचिन खेडेकरांनी साकारलेला आलोकचा बाबा ते म्हणतात तसाच खूप गोड आहे. म्हणजे त्यांच्या करिअर मधील एक अतिशय महत्वाचा आणि माझा सगळ्यात जास्त आवडलेला रोल असावा. चिन्मयी सुमीत नाव घेतलं की.. "जरा चा चं बघा !'' असं म्हणणारी बाईंडर मधील चंपा डोळ्यासमोर चटकन उभी राहते. पण तिची 'आलोक..." ही प्रेमळ हाक ऐकताच मनावरचं चंपाचं गारुड उतरतं. गाडी चालवतानाचा तिचा आनंद, नवीन गोष्टी समजून घेताना होणारी घालमेल खूप छान साकारली आहे. मिथिला पालकर 'गर्ल इन द सिटी' मुळे आवडत होतीच. पण इथे पहिल्याचं चित्रपटात अमेय सोबत ताकदीने उभी राहते.
अमेय वाघ मला पहिल्यापासूनच खूप आवडतो. दिल दोस्ती दुनियादारी, दोबारा, भाडीपा, बॉयगिरी, घंटा, पोपट, गेली २१ वर्ष, हे सर्व पाहताना तो अधिकाधीक आवडत गेला. आणि इथं तर त्याहून अधिक. आलोक साकारताना, त्याचे स्वतःच्या कॉम्प्लेक्स मध्ये गुरफटलेला, आईबाबांशी बोलताना इरिटेट होणारा... असं सगळंच त्याने झकास साकारलं आहे.


तर असा हा मुरांबा ! हे वाचणाऱ्या बहुतांशी लोकांनी पाहिला असेलच. मलाच पाहायला उशीर झाला. पण पुन्हा पाहीन लवकरचं. अधिक वेळा पाहून आणखी आनंद देणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पुन्हा चाखायला जा. आणि ज्यांनी अजूनही पाहिला नसेल त्यांनी हे वाचून तरी नक्की नक्की जा !

Comments

Popular Posts