दंगल

हिंदी चित्रपटांमध्ये 'खेळावर' आधारित चित्रपट म्हणलं की जरा अवघडल्यासारखं होतं. अर्थात लगान, चक दे इंडिया !, पान सिंग तोमर, इक्बाल, भाग मिल्खा भाग आणि एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी अशा काही चित्रपटांनी या विचाराला भेद देण्याचा प्रयत्न नक्कीच केला.
चक दे इंडिया !, इक्बाल आणि लगान हे तर छान होतेच.
पण त्यापैकी पान सिंग तोमर, भाग मिल्खा भाग आणि एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हे खेळावर आधारित असे चरित्रपट. अर्थात हे तिन्ही सुंदरच होते. पण आपल्याकडे चरित्रपट म्हणलं की त्या व्यक्तीला एवढं ग्लोरिफाय करायचं, एवढ्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवायचे, की काय विचारायलाचं नको. त्या व्यक्तीने घेतलेले चुकीचे निर्णय, त्याच्या स्वभावातील दोष एकूणच काय तर 'ग्रे शेड' पाहायलाच मिळत नाही. आणि हीच या चित्रपटांची मोठी समस्या असते.
अर्थात पान सिंग तोमरच्या बाबतीत सुदैवाने तसे होत नाही. कदाचित झाले सुद्धा असते पण ती कथाच 'खेळाडू ते डाकू' अशा काहीशा प्रवासाची असल्याने तसे होत नाही. पण त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही ही दुर्दैवाची बाब.
मधील काळात मेरी कोम, विक्टरी, पटीयाला हाऊस, दिल बोले..., सुलतान असे काही खेळांवर आधारित चित्रपट सुद्धा आले. पण त्यांच्याबद्दल बोलावे एवढे ते महत्वाचे अथवा चांगले होते असे मला नाही वाटत(हे माझे वैयक्तिक मत).
आणि अशा या चरित्रपटांच्या आणि खेळांवर आधारित चित्रपटांच्या होणाऱ्या गर्दीत आता अजून एका नावाची भर पडली आणि ते नाव म्हणजे 'दंगल'.
महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या गीता-बबिता या मुली. यांच्या आयुष्यावर आधारित येणारा हा नवा चित्रपट.
'दंगल' २३ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. पण नेहमीच आमीर खान चा चित्रपट येणार म्हणल्यावर जो काही माहोल, चर्चा अपेक्षित असते ती आत्तापासूनच होते आहे असे काहीसे चित्र दिसून येत आहे. याच्या जोडीला 'ते' वादग्रस्त(?) विधान आहेच. एकूणच काय तर 'दंगल' ची अपेक्षेप्रमाणे हवा आहे.
एक-दोन महिन्यांपूर्वीच दंगलचे पोस्टर आलं होतं...

महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारताना आमीर खान आणि त्यांच्या चार मुली(!) दिसत होत्या.
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के ?... अशी टॅग लाईन असलेले ते पोस्टर उत्कंठावर्धक होतेच. 
आणि कालंच दंगलचा ट्रेलर रिलीज झाला. सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. 'त्या' विधानाची काही महाभागांनी आठवण ही करून दिली.
असो. आता जरा ट्रेलर बद्दल बोलूया...
ट्रेलर कसा असावा ? तर तो चित्रपटातील फक्त ठळक मुद्द्यांवर भाष्य न करता, चित्रपटाची रूपरेषा सांगणारा आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारा असावा, असे साधारणपणे म्हणले जाते. दंगलचा ट्रेलर या बाबतीत 'आदर्श' आहे !
ट्रेलर ची सुरुवातच होते ती एका कमेंट्रीने...महावीर सिंग फोगट यांनी ५ गुण मिळवत चॅम्पियनशिप जिंकली आहे.
सुरुवातच विजयाने होत आहे म्हणल्यावर काय...भारीच !
आणि मग लगेचचं महावीर फोगट यांचा...

"मेडलिस्ट पेड पे नही उगते, उन्हे बनाना पडता है।
प्यार से, मेहनत से, लगन से"
हा हरयाणी भाषेतील डायलॉग कानावर पडतो. वाह !
त्यानंतर भारताची स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी आणि महावीर फोगट यांचं ऑलिम्पिक गोल्ड मेडलचं अपुरं स्वप्न, ते आपल्या मुलांकडून पूर्ण करून घेणार हे लगेचंच लक्षात येतं.
"अपना तिरंगा सबसे उप्पर लेहरा वेगा"
हे स्वप्न ही महावीर फोगट बोलून दाखवतात.
पण मग त्यांना चारही मुलीचं झाल्या आहेत असं समजल्यावर, आपलं स्वप्न अपूरचं राहणार असं त्यांना वाटू लागतं. पण मुलगी जन्माला आल्याचं दुःख नाही असे ही ते सांगून जातात.
पुढच्या एका प्रसंगात गावातील दोन मुलांना बेदम मारल्याचे दाखवले आहे आणि मग जेंव्हा महावीर फोगट यांना समजते की त्यांना आपल्या मुलींनी मारले आहे तेंव्हा...

"मैं हमेसा ये सोच के रोता रहा की छोरा होता तो देस के लिये कुस्ती में गोल्ड लाता।
यो बात मेरी समज में ना आयी की, गोल्ड तो गोल्ड ही होता है।
छोरा लावे वा छोरी !"
आणि मग या तीन मिनिटाच्या ट्रेलरचं चित्रचं पालटून जातं.
महावीर फोगट आपल्या मुलींसाठी, त्यांच्यासोबत स्वतः मेहनत घेताना दिसतात. त्याच वेळी बॅकग्राऊंड स्कोअर साठी वापरलेले हरयाणी बाजाचं संगीत ऐकून वेगळाच जोष येतो.

त्यानंतर च्या एका प्रसंगांमध्ये, बबिताचा ...
बहुत हो गयी पेहलवानी, अब दंगल होगा!
हा डायलॉग ऐकून आणि पुढचे काही प्रसंग पाहून, चित्रपट हा फक्त आमिर खान वर केंद्रित नसून इतरांनाही तेवढेच प्राधान्य असावे, असा अंदाज बांधता येतो.
त्यानंतर मग 'घमासान' कुस्तीच्या स्पर्धा, जल्लोष आणि आपल्या मुलींना प्रेरित आणि उत्तेजित करणारे फोगट दिसून येतात.
आणि त्यानंतर येते ती ट्रेलर मधील सर्वात सुंदर फ्रेम.

आणि सोबतीला फोगट यांचा डायलॉग...
"एक बात हमेसा याद रखना बेटा, 
अगर सिल्वर जिती, तो आज नही तो कल लोग तंने भूल जावेंगे।
गोल्ड जिती, तो मिसाल बन जावेगी !
और मिसाले दी वी जाती है बेटा, भुली नाही जाती।'
आणि मग जे काही रोमांच उभारतात, ते केवळ अनुभवण्यासारखेच.
त्यानंतरच्या काही पुढच्या प्रसंगात, प्रेम, लोभ, माया, त्याग, उत्साह, क्रोध अशा सर्व भावनांना अतिशय ताकदीने कॅमेऱ्यात कैद केल्याची सुप्त जाणीव मनात होते.
मग एका प्रसंगांमध्ये सुरुवातीला दाखवलेल्या छटा उलगडताना, तरुणपणीचे महावीर फोगट कुस्ती खेळताना दाखवले आहेत. तेही वाखाणण्याजोगेच.

आणि मग शेवटी पुन्हा एकदा फोगट यांचा डायलॉग...
"म्हारी छोरियां छोरों से कम हैं के ?"
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

आणि या सगळ्यात जान आणतो तो 'मि.परफेकशनिस्ट'.
तो काय आहे, कसा आहे आणि काय करतो हे मी सांगण्याची गरजचं नाही !
त्याच्या दोन्ही मुली आणि साक्षी तनवार सुद्धा अगदी योग्य आहेत, असंच दिसतंय.
मध्ये करण जोहर आणि जावेद अख्तर यांनी दंगलचं गेल्या 'दशकातील सर्वोत्कृष्ट चित्रपट' असं वर्णन केलं आहे, ते उगाचच नाही हे ट्रेलर पाहूनचं लक्षात येते.
एकूणच काय आमिर खान आणि नितेश तिवारी यांचा दंगल भन्नाट, वेगळी वाट दाखवणारा, स्त्री शक्तीला उद्ययुक्त करणारा आणि एकमेव अद्वितीय असणार असंच दिसतंय.
आता फक्त २३ डिसेंबर ची वाट पाहणे, एवढेच आपल्या हातात.
भेड की हाहाकार के बदले, शेर कि एक दहाड है प्यारे।
दंगल दंगल...

Comments

Popular Posts