शिवाय

दिवाळी आणि हिंदी चित्रपट यांचं गणित काही फारसं चांगलं नाही. म्हणजे बघा अगदी ओम शांती ओम, ब्ल्यू, ऑल द बेस्ट, रा वन, जब तक है जान, सन ऑफ सरदार, हैप्पी न्यू इयर पासून, अगदी गेल्या वर्षीच्या प्रेम रतन धन पायो पर्यंत. हे सर्व चित्रपट दिवाळी मध्ये प्रदर्शित झाले. आणि ते कसे होते हे सांगायची फारशी गरज नाही.
या वर्षी दिवाळीत दोन नवे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शिवाय आणि ऐ दिल है मुश्किल.
अजय देवगण दिग्दर्शित शिवाय हा त्याचा महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित चित्रपट. अतिशय भव्य अशा स्तरावर चित्रित झालेला शिवाय आजच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
चित्रपटाची कथा म्हणाल तर... लिआम निसन चा 'टेकन' आठवतोय. तशीच काहीशी आहे. Child Trafficking, मुलींचे अपहरण, परदेशामधील पोलीस खात्यांमध्ये चालणारा गैर प्रकार या सगळ्या गोष्टी यात आहेत. आणि त्यात पुन्हा गरज नसलेला इमोशनल ड्रामा सुद्धा आहेच. पण हा चित्रपट 'टेकन' शी सुद्धा प्रामाणिक राहत नाही. अधून मधून रॉकी हँडसम, ऍक्शन जॅक्सन आणि हो ! तो बजरंगी भाईजान सुद्धा डोकावतो.
तब्बल १५२ मिनिटांचा शिवाय खरोखर प्रेक्षकांची परीक्षाच घेतो. बारीक डोळे करून संपूर्ण चित्रपटात वावरणाऱ्या अजय देवगणला पाहताना तुमचेच डोळे हळू हळू मिटतील याची मात्र मी नक्की खात्री देतो. बंदिस्तपणा नसलेली शिवायची कथा मनाला येईल तिकडे भावनेच्या भरात थोडीफार भरकटत राहते.
हिमालय चढणाऱ्या गिर्यारोहकांना मदत करणारा आणि सतत हुक्का ओढणारा द नायक म्हणजे शिवाय. तो म्हणे शिवाचा खूप मोठा भक्त.
आणि का तर... त्याच्या शरीरवर असणारे शिवाचे टॅटू !
हसू नका... अहो खरंच तसं दाखवलं आहे.
आणि त्याची मुलगी कोण तर...बजरंगी भाईजान मधली मुन्नी आठवतीय. हां तशीच तशीच ! ती तशी का आहे याचं उत्तर काही नाही मिळत. किंवा ना त्याचा कुठे चित्रपटात वापर होतो.
कलाकार तर असले भारी आहेत ना, की कोणाला सुद्धा कामाचा गंधचं नाही. अजय देवगण आणि गिरीश कर्नाड याला काहीसे अपवाद आहेत म्हणा. 
मिथुनच्या संगीतामध्ये सुद्धा कथेप्रमाणेच फारसं नाविन्य नाही. हे आधी कुठे तरी ऐकलं आहे असं सारखं जाणवत राहतं. तरी बोलो हर हर आणि दरखास्त छान आहेत.
चित्रपटात भरपूर ऍक्शन आहे. ती चांगली झाली आहे, हे पण खरं. पण त्यात सुद्धा तर्कशुद्धतेचा काहीसा अभाव आहे. म्हणजे बघा हेलिकॉप्टर मधून दोघे जण तुफान फायरिंग करत आहेत पण रस्त्यावरुन एकट्याच पळणाऱ्या शिवायला एकही गोळी लागत किंवा रस्त्यावरून पळत असताना सुद्धा पोलिसांच्या अनेक गाड्या मागे लागल्या असून ही शिवाय ला पकडू शकत नाही म्हणजे काय. 
एडिटिंगचं म्हणाल तर सरळसोट फ्लॅशबॅक मध्ये कथा पुढे सरकत राहते. त्यामुळे प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे नाट्य किंवा प्रसंगाची मांडणी सुद्धा यात नाही.
बरं, आता मग यात नवीन आणि पाहण्यासारखं असं काय तर ते मनाला भुरळ घालणारा हिमालय. त्या हिमशिखरांमध्ये हरवून जायला होत हे खरं. पण तो आनंद ही फार काळ टिकत नाही.
चित्रपटाचा लूक जरी चकचकीत असला तरी कथा, अभिनय आणि दिग्दर्शनामधील कमतरतांमुळे शिवाय पुरता फसला आहे. 
त्यामुळे 'शिवायच्या' शिवाय दिवाळी साजरी केलेली बरी. मस्त पैकी फराळ करा, फिरायला जावा, एकूणच काय तर धम्माल करा. पण शिवायच्या नादाला लागून आपला फेस्टिवल मूड काही घालवू नका.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
-आशुतोष 😃




Comments

Popular Posts